तुळसण खिंडीत केली होती लुटमार; कराड ग्रामीण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ कराड
गत आठवडय़ात शुक्रवारी रात्री कराड तालुक्यातील कोळेवाडी-शिंदेवाडी रोडवरील खडी क्रशरचे मालक व जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्या भावाला पाठलाग करून अडवल्याचा प्रकार घडला होता. त्यांच्या बोलेरो गाडीची काच फोडून चोरटय़ांनी तब्बल 2 लाख 2 हजारांची रोकड पळवली होती. दरम्यान या घटनेचा अवघ्या चार दिवसांत छडा लावत कराड पोलिसांनी इंदापूर तालुक्यासह कराडच्या काही संशयितांची टोळी गजाआड केली. या टोळीने उमाकांत ऊर्फ उमेश रघुनाथ खबाले (वय 51) यांच्यावर पाळत ठेवून पैसे लुटल्याचे तपासात समोर येत आहे.
दरम्यान या गुह्यात खबाले यांच्याशी ओळख असलेल्या काही संशयितांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विंग येथील उमाकांत खबाले यांचे दत्तगुरू स्टोन क्रशर आहे. गत आठवडय़ात शुक्रवारी रात्री ते स्टोन क्रेशरचे काम संपवून बोलेरे गाडीतून रात्री नऊच्या सुमारास घरी निघाले होते. तुळसण खिंडीतून ते कोळेवाडीकडे जात असताना एका ओढय़ाजवळ त्यांच्या गाडीला दुचाकी आडवी मारून तिघांनी थांबवले. तिघा चोरटय़ांनी दहशत माजवत बोलेरोची काच फोडून उमाकांत खबाले यांना धमकी देऊन त्यांच्याकडील 2 लाख 2 हजारांची रोकड, मोबाईल, बोलेरोची चावी लंपास केली. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली होती. व्यापारी, व्यावसायिकात भीतीचे वातावरण होते.
पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे
रोडरॉबरी करून खबाले यांचे पैसे लुटणारे तिघे नेमके आले कोठून आणि ते पसार कोठे झाले. ते स्थानिक पातळीवर कोणाच्या संपर्कात होते का? यावर पोलिसांनी तपासाची दिशा केंद्रित केली. एसपी समीर शेख, अपर अधीक्षक बापू बांगर यांनी तपासात लक्ष घालत डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक अलीअहमद मुल्ला, रेखा दूधभाते यांना वेळोवेळी सूचना केल्या. गुन्हा घडल्यापासून कराड ग्रामीण पोलीस वेगवेगळ्या पथकाद्वारे तपासात गुंतले होते. मिळेल त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह जे लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने खबालेंच्या स्टोन क्रेशरवर पाळत ठेवून होते, अशा संशयास्पद व्यक्तींच्या मागे पोलिसांनी चौकशीचा फेरा लावला होता. यातूनच पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. गुह्याचा छडा लावण्यासाठी हे धागेदोरे महत्त्वाचे ठरले.
रोड रॉबरीचे कनेक्शन इंदापूरपर्यंत
रोड रॉबरी करणारांचे धागेदोरे हाती आल्यावर डीवायएसपी रणजीत पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अलीअहमद मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सज्जन जगताप, महेश लावंड, सचिन साळुंखे, सचिन निकम यांचे पथक रवाना केले. या पथकाने इंदापूर, बारामती, वालचंदनगर या भागात छापे टाकून संशयितांना अटक केली. पाच संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुह्याची कबुली दिली. त्यांना अटक करून कराड न्यायालयात हजर केले असता संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिले. तपास डॉ. रणजीत पाटील करत आहेत.