पाच वर्षांपासून `कट्टर ख्रिस्तीयानो’ ग्रुपतर्फे वाढदिनी शाळांना दिले जाते खेळाचे साहित्य भेट
संग्राम काटकर / कोल्हापूर
आपल्या दर्जेदार खेळाने जगभरात चाहते निर्माण करत महान फुटबॉलपटूंच्या यादीत स्थान मिळविलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोचे कोल्हापुरातील काही चाहते २०१५ साली एकत्र आले. त्यांनी `कट्टर ख्रिस्तीयानो समर्थक कोल्हापूर’ या नावाने व्हॉटस्ऍप ग्रुप बनविला. त्यावर रोजच्या रोज रोनाल्डोने फुटबॉल सामन्यात केलेल्या गोलचे व्हीडीओ आणि त्याच्या खेळावरील अतिव प्रेम शेअर होऊ लागले. कालांतराने ग्रुपवर ५ फेब्रुवारी हा रोनाल्डोचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली गेली. दोन वर्षे नुसता वाढदिवस साजरा केल्यानंतर पुढील वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे ग्रुपवर ठरले. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून ५ फेब्रुवारीला रोनाल्डोचा वाढदिवस साजरा करत महापालिकेच्या शाळेला १५ हजार रुपयांपर्यंतचे खेळाचे साहित्य चाहत्यांकडून भेट दिले जात आहे.
या चाहत्यांनी नुकताच रोनाल्डोचा ३६ वा वाढदिवस साजरा करुन पाचगावमधील जोतिर्लिंग विद्यामंदिराला खेळाचे साहित्य भेट देऊन शाळेतील कमतरता भरून काढली. `कट्टर ख्रिस्तीयानो समर्थक कोल्हापूर’ या व्हॉटस् ऍप ग्रुपची माहिती जशी मिळू लागली तशी रोनाल्डोचे चाहते ग्रुपमध्ये ऍड करा अशी मागणी करू लागले. ग्रुपमध्ये ऍड करण्याची मागणी वाढतच गेल्याने `कट्टर ख्रिस्तीयानो समर्थक कोल्हापूर या ग्रुपचे आणखी ९ ग्रुप तयार केले. विराज पोतदार, मयुर पौंडकर, सम्राट साळोखे, योगेश मोहिते, दिवेश कोरे, अक्षय गवळी, तुषार मगदुम, शुभम वाली, पार्थ हजारे व प्रणव साळोखे हे सर्वजण ग्रुपऍडमिन म्हणून कार्यरत आहेत. या ग्रुपऍडमिनच्या संपर्कातील १७ ते २५ या वयोगटातील अडीच हजारांवर रोनोल्डोचे चाहते दहाही ग्रुपमध्ये ऍड आहेत. रोनाल्डोचा सामना टीव्हीसमोर बसून पाहणार म्हणजे पाहणार असेच हे सर्व चाहते आहे. हे चाहते रोनाल्डोच्या खेळाचे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करतात. या पोस्ट वाचल्या की रोनाल्डो हा ग्रुप सदस्यांची दिल की धडकनच बनला आहे याची प्रचिती येते. ग्रुपमधील सदस्यांनी २०१५ साली रोनाल्डोचा वाढदिवस साजरा करण्याला सुरवात केली. पहिली दोन वर्षे साधेपणाने साजरा केला. नंतर मात्र सामाजिक किनार घेऊन वाढदिवस साजरा करण्याचे ठरले.
त्यानुसार दरवर्षीचा ५ फेब्रुवारीला रोनाल्डोचा वाढदिवस साजरा करत महापालिकेच्या शाळांना खेळाचे साहित्य भेट दिले जाऊ लागले. हे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्रुपवर वर्गणी काढली जाते. ती ऍडमिनकडे जमा केली जाते. जमलेल्या पैशातून खेळ व मासपीटीचे सर्व साहित्य खरेदी केले जाते. रोनाल्डोच्या वाढदिनी ज्या शाळेला मदत द्यायची ठरले आहे, तेथे ग्रुप सदस्य एकत्र येऊन केक कापून रोनाल्डोचा वाढदिवस साजरा करतात आणि खरेदी केलेले खेळाचे साहित्य शाळेला भेट देऊन माघारी परतात.
५ शाळांना भेट दिले खेळाचे साहित्य
रोनाल्डोच्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती राजाराम महाराज उर्दु मराठी विद्यालय, पद्मभुषण वि. स. खांडेकर विद्यालय, राजर्षी शाहू प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, प्रिन्स शिवाजी विद्यालयास क्रिकेट, फुटबॉल, दोर उड्या, बॅडमिंटन, गोळाफेक या खेळांच्या साहित्यांसह क्लपर, रिंग, स्टॉपवॉच, मार्कर, ढोल, ड्रम, घुमके अशा वस्तुही भेट दिल्या आहेत. असेच साहित्य नुकतेच पाचगावमधील श्री जोतिर्लिंग विद्यामंदिराला भेट दिले आहे. दोनच वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर ‘cristiano_kolhapur’ या नावाने पेज तयार केले आहे. तब्बल १५ हजार फॉलोअर्सचा टप्पा या पेजने नुकताच पार केला आहे.
– विराज पोतदार (ग्रुप ऍडमिन)