रविकुमार समर्थची 192 धावांची खेळी, कर्नाटकची केरळवर 80 धावांनी मात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बेळगावचा युवा जलद गोलंदाज रोनित मोरेचे 36 धावातील 5 बळी व रविकुमार समर्थ (192), देवदत्त पडिक्कल (101) यांच्या दणकेबाज शतकाच्या बळावर कर्नाटकने केरळ संघाचा 80 धावांनी धुव्वा उडवत विजय हजारे चषक स्पर्धेत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. प्रारंभी, समर्थ, पडिक्कल यांच्या धुवांधार शतकांमुळे कर्नाटकने 3 बाद 338 धावा झोडपल्या तर प्रत्युत्तरात रोनितच्या भेदक माऱयासमोर केरळचा डाव 258 धावांवरच आटोपला.
एअरफोर्स मैदानावरील या लढतीत केरळचा नाणेफेक जिंकून कर्नाटकला प्रथम फलंदाजीला पाचारण करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे स्पष्ट झाले. 28 वर्षीय समर्थने 158 चेंडूंच्या खेळीत 22 चौकार व 3 षटकार खेचत 192 धावा फटकावल्या. त्याने अवघ्या 112 चेंडूतच शतक साजरे केले होते. पडिक्कलने देखील 10 चौकार व 2 षटकार फटकावले. समर्थ, पडिक्कलच्या या फटकेबाजीमुळे कर्नाटकने 35 षटकात बिनबाद 196 धावा करत ही लढत एकतर्फी असेल, याचेच संकेत दिले होते.
पडिक्कल पुढे 43 व्या षटकात बाद झाला तर मनीष पांडेने नाबाद 34 धावांपर्यंत मजल मारली. समर्थ 49 व्या षटकात बाद झाला, तोवर कर्नाटकने 300 धावांचा टप्पा सर केला होता. केरळतर्फे बसिल एनपीने 57 धावात 3 बळी घेतले. स्पीडस्टार एस. श्रीशांत (10 षटकात 0-74) मात्र भलताच महागडा ठरला.
रोनितची भेदक गोलंदाजी
विजयासाठी 339 धावांचा पाठलाग करणाऱया केरळला बेळगावचा युवा जलद गोलंदाज रोनित मोरेने (5-36) प्रारंभीच जबरदस्त धक्के दिले आणि यातून केरळचा संघ शेवटपर्यंत सावरु शकला नाही. रोनितने प्रथम रॉबिन उत्थप्पाला (2) पायचीत केले व रोहन कुन्नूमलला (2) प्रसिद्ध कृष्णाकरवी झेलबाद केले. त्यानंतर त्याने 92 धावांवर वत्सल गोविंदची खेळी संपुष्टात आणली तर तळाचे फलंदाज बसिल (2), श्रीशांत (4) यांनाही तंबूचा रस्ता दाखवला.
तत्पूर्वी, एम. प्रसिद्ध कृष्णाने (1-22) विष्णू विनोदला (28) बाद केल्यानंतर केरळची 3 बाद 52 अशी दाणादाण उडाली होती. वत्सल गोविंद (92) व सचिन बेबी (27) यांनी चौथ्या गडय़ासाठी 59 धावांची भागीदारी साकारली. पण, ऑफस्पिनर के. गौतमने (2-73) ही जोडी फोडली. त्याने बेबीला बाद केले आणि केरळची 4 बाद 112 अशी स्थिती झाली. वत्सलने मोहम्मद अझरुद्दीनसह (52) पुढे 92 धावांची भागीदारी केली. श्रेयस गोपालने (2-64) दुहेरी यश प्राप्त केले. जलज सक्सेना (24) बाद झाला, तेथेच केरळचा डाव 258 धावात संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक ः 3-338 (रविकुमार समर्थ 192, देवदत्त पडिक्कल 101,. बसिल एनपी 3-57). केरळ ः 43.4 षटकात 258 (वत्सल गोविंद 92, मोहम्मद अझरुद्दीन ज्युनियर 52, रोनित मोरे 5-36, श्रेयस गोपाल 2-64)
प्रियंक पांचाळचे शतक, गुजरात उपांत्य फेरीत
नवी दिल्ली ः कर्णधार प्रियंक पांचाळचे (134) आक्रमक शतक व गोलंदाजांची प्रभावी कामगिरी या बळावर गुजरातने आंध्र प्रदेश संघावर 117 धावांनी मात केली आणि विजय हजारे चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पांचाळच्या शतकानंतर गुजरातने 7 बाद 299 धावा केल्या व प्रतिस्पर्धी आंध्रला 182 धावांमध्ये गुंडाळले. भारताचा कसोटीपटू व आंध्र कर्णधार हनुमा विहारी 5 चेंडूत शून्यावर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
गुजरात ः 7 बाद 299 (प्रियंक पांचाळ 134, राहुल शाह 36, एम. हरिशंकर रेड्डी 3-60, ए. ललित मोहन 2-55) आंध्र प्रदेश ः 182 (रिकी भुई 67, अरजान नगवासवाल्ला 4-28, पियुष चावला 3-33).
उत्तराखंडला नमवून दिल्ली उपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली ः यष्टीरक्षक-फलंदाज अनूज रावतने डझनभर षटकार खेचत 85 चेंडूत नाबाद 85 धावांची खेळी साकारल्यानंतर दिल्लीने उपउपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडला 4 गडी राखून मात दिली. प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने 50 षटकात 8 बाद 287 धावा केल्या तर दिल्लीने प्रत्युत्तरात 48.3 षटकात विजयाचे लक्ष्य गाठले. आता दिल्लीची उपांत्यपूर्व लढत सोमवारी उत्तर प्रदेशविरुद्ध होईल.
संक्षिप्त धावफलक
उत्तराखंड ः 50 षटकात 8-287 (कमल सिंग 83 चेंडूत 77, कुणाल चंदेला 83 चेंडूत 62. प्रदीप संगवान 3-59, नितीश राणा 2-40). दिल्ली ः 48.3 षटकात 6-289 (नितीश राणा 88 चेंडूत 81, अनूज रावत 85 चेंडूत नाबाद 85, प्रदीप सांगवान 49 चेंडूत नाबाद 58. समद फल्लाह 2-64).