वृत्तसंस्था/ रोम
भारताची महिला मल्ल विनेश फोगटने 2020 हंगामातील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आपले पहिले सुवर्णपदक पटकाविले. शुक्रवारी येथे झालेल्या रोम मानांकन सिरीज आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इक्वेडोरच्या लुईसा एलिझाबेथ व्हेलव्हेरेडचा 53 किलो वजनगटात 4-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
रोममधील या मानांकन महिलांच्या कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनगटात भारताच्या अनशु मलिकने रौप्यपदक पटकाविले. 53 किलो वजनगटात विनेश फोगटने चीनच्या दोन मल्लांचा पराभव करत अंतिम फेरी प्रवेश मिळविला होता. विनेशने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या लढतीत बेराझाचा 10-0, दुसऱया लढतीत लुओचा 15-5 तर तिसऱया लढतीत चीनच्या पेंगचा 4-2 अशा गुणांनी पराभव केला. महिलांच्या 57 किलो वजनगटात 18 वर्षीय अनशु मलिकला सुवर्णपदकाच्य ालढतीत नायजेरियाच्या ऍडेकुओरोईकडून हार पत्करावी लागली.
मलिकने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटात प्रवेश केला होता. अनशुने उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या बुरकर्ट त्यानंतर नॉर्वेच्या बुलेनचा तसेच 2019 च्या विश्वविजेत्या कॅनडाच्या मोरेसचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. या स्पर्धेत भारताच्या दिव्या काकरनला पदकविना मायदेशी परतावे लागत आहे. 68 किलो गटातील कास्यपदकासाठीच्या लढतीत कॅनडाच्या लॅफेगीने दिव्या काकरनचा पराभव केला.
50 किलो गटात भारताच्या निर्मलादेवीचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. पुरूषांच्या विभागात 97 किलो वजनगटात भारताच्या सत्यवर्त कडीयानने तसेच 125 किलो वजनगटात सुमीत मलिकचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. युक्रेनच्या मॅचेडिलेझीने कडीयानचा 2-0 तर कॅनडाच्या डेसीने सुमीत मलिकचा तांत्रिक गुणांवर पराभव केला.