सनरायजर्स हैदराबादला शेवटच्या चेंडूवर धूळ चारली
चेन्नई / वृत्तसंस्था
निर्धारित 20 षटकांचा सामना टाय झाल्यानंतर रोमांचक सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली आणि पूर्ण 2 गुण वसूल केले. सुपरओव्हरमध्ये सनरायजर्स हैदराबादला अक्षर पटेलच्या षटकात केवळ 7 धावा घेता आल्या तर प्रत्युत्तरात दिल्लीने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेत या संघर्षमय लढतीची यशस्वी सांगता केली.
तत्पूर्वी, उभय संघातील निर्धारित 20 षटकांची लढत रोमांचकरित्या टाय झाली. दिल्ली कॅपिटल्सने 4 बाद 159 धावा केल्या तर प्रत्युत्तरात सनरायजर्स हैदराबादने देखील 20 षटकात 7 बाद 159 धावाच केल्या. यामुळे या लढतीत सुपरओव्हरचा अवलंब केला गेला. सनरायजर्सच्या डावात केन विल्यम्सनने 51 चेंडूत नाबाद 66 तर जॉनी बेअरस्टोने 18 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 38 धावा फटकावल्या. याशिवाय जे. सुचितने नाबाद 14 धावा केल्या. दिल्लीच्या अवेश खानने 34 धावांत 3, अक्षर पटेलने 26 धावांत 2 बळी टिपले.
पृथ्वी शॉचे अर्धशतक
पृथ्वी शॉच्या (39 चेंडूत 53) झंझावाती अर्धशतकानंतरही दिल्ली कॅपिटल्सला सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 20 षटकात 4 बाद 159 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. शॉ व शिखर धवन (26 चेंडूत 28) यांनी 81 धावांची तडाखेबंद सलामी देत मोठय़ा धावसंख्येची उत्तम पायाभरणी केली होती. पण, त्यांचे अन्य फलंदाज यावर कळस चढवू शकले नाहीत.
हैदराबादचा फिरकी गोलंदाज रशीद खान (4 षटकात 1-31) व जगदीश सुचित (4 षटकात 0-21) यांनी नियंत्रित मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना वेसण घातली. कर्णधार रिषभ पंत (37) व स्टीव्ह स्मिथ (नाबाद 34) यांनी चौथ्या गडय़ासाठी 58 धावांची भागीदारी साकारत किमान आव्हानात्मक धावसंख्येच्या उंबरठय़ापर्यंत तरी पोहोचता येईल, याची तजवीज केली.
पृथ्वी शॉने खलील अहमदच्या गोलंदाजीवर पहिले तिन्ही चेंडू चौकारासाठी पिटाळत उत्तम सुरुवात केली. त्याचे कव्हर ड्राईव्ह विशेष लक्षवेधी होते. सिद्धार्थ कौलला (2-31) लाँगऑनच्या दिशेने खेचलेला उत्तुंग षटकार देखील त्याच्या भात्यातील फटक्यांचे वैविध्य अधोरेखित करणारे ठरले. शॉ उत्तम फटकेबाजी करत असल्याने धवनने त्याला पूरक साथ देण्यावर भर दिला आणि दिल्लीने पॉवर प्ले षटकांअखेर बिनबाद 51 धावांपर्यंत मजल मारली.
डावखुरा फिरकीपटू सुचितने हैदराबादकडून पहिला सामना खेळताना 4 षटकात केवळ 21 धावा दिल्या. त्याने धवनला सातत्याने अडचणीत आणले. सनरायजर्स हैदराबादचा अव्वल फिरकीपटू रशीद खानने धवनचा त्रिफळा उडवत दिल्लीची 81 धावांची सलामी भागीदारी फोडली. नंतर शॉची दर्जेदार खेळी कर्णधार पंतशी समन्वयात उडालेल्या गोंधळामुळे संपुष्टात आली.
पंत व माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी धावफलक हलता ठेवण्यावर भर दिला. स्मिथला विजय शंकरच्या गोलंदाजीवर कौलने 14 धावांवर जीवदान दिले तर खलीलने रशीदच्या गोलंदाजीवर पंतचा झेल सोडला. या उभयतांनी नंतर काही चौकार वसूल केले. पण, डावावर प्रामुख्याने हैदराबादच्या गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ धावचीत (अहमद-सुचित) 53 (39 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), शिखर धवन त्रि. गो. रशीद खान 28 (26 चेंडूत 3 चौकार), रिषभ पंत झे. सुचित, गो. कौल 37 (27 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), स्टीव्ह स्मिथ नाबाद 34 (25 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), शिमरॉन हेतमेयर झे. विल्यम्सन, गो. कौल 1 (2 चेंडू), मार्कस स्टोईनिस नाबाद 2 (2 चेंडू). अवांतर 4. एकूण 20 षटकात 4 बाद 159.
गडी बाद होण्याचा क्रम
1-81 (धवन, 10.2), 2-84 (शॉ, 11.3), 3-142 (रिषभ, 18.2), 4-145 (हेतमेयर, 18.6).
गोलंदाजी
खलील अहमद 4-0-42-0, अभिषेक शर्मा 1-0-14-0, सिद्धार्थ कौल 4-0-31-2, जगदीश सुचित 4-0-21-0, विजय शंकर 3-0-19-0, रशीद खान 4-0-31-1.
सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर धावचीत (रबाडा-पंत) 6 (8 चेंडू), जॉनी बेअरस्टो झे. धवन, गो. अवेश खान 38 (18 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), केन विल्यम्सन नाबाद 66 (51 चेंडूत 8 चौकार), विराट सिंग झे. स्टोईनिस, गो. अवेश खान 4 (14 चेंडू), केदार जाधव यष्टीचीत पंत गो. मिश्रा 9 (9 चेंडूत 1 चौकार), अभिषेक शर्मा पायचीत गो. पटेल 5 (6 चेंडू), रशीद खान पायचीत गो. पटेल 0 (1 चेंडू), विजय शंकर त्रि. गो. अवेश खान 8 (7 चेंडू), जगदीश सुचित नाबाद 15 (6 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार). अवांतर 8. एकूण 20 षटकात 7 बाद 159.
गडी बाद होण्याचा क्रम
1-28 (डेव्हिड वॉर्नर 3.2), 2-56 (बेअरस्टो, 5.4), 3-84 (विराट सिंग, 11.2), 4-104 (केदार जाधव, 14.2), 5-117 (अभिषेक शर्मा, 16.1), 6-117 (रशीद, 16.2), 7-136 (विजय शंकर, 18.3).
गोलंदाजी
कॅगिसो रबाडा 3-0-25-0, रविचंद्रन अश्विन 4-0-27-0, मार्कस स्टोईनिस 1-0-12-0, अक्षर पटेल 4-0-26-2, अवेश खान 4-0-34-3, अमित मिश्रा 4-0-31-1.