पाहुण्या विंडीज संघाला 113 धावांनी लोळवले, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स विजयाचे शिल्पकार
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पिछाडीवर असलेल्या यजमान इंग्लिश संघाने येथील दुसऱया कसोटी सामन्यात विंडीजला धूळ चारली आणि मालिकेत 1-1 अशी महत्त्वपूर्ण बरोबरी देखील साधली. विजयासाठी 312 धावांचे आव्हान असताना विंडीजचा डाव 70.1 षटकात सर्वबाद 198 धावांमध्येच खुर्दा झाला.
साऊदम्प्टन येथील पहिली कसोटी जिंकत दिमाखात सुरुवात केलेल्या विंडीजकडून येथील कसोटीत देखील संघर्षात्मक खेळाची अपेक्षा होती. मात्र, त्या तुलनेत इंग्लिश संघाने जोरदार मुसंडी मारण्यात पाचव्या दिवसातही उत्तम यश मिळवले.
दिवसाच्या प्रारंभी, 2 बाद 37 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर इंग्लंडने 11 षटकात जलद 92 धावा फटकावल्या आणि 3 बाद 129 या धावसंख्येवर डाव घोषित करत विंडीजला विजयासाठी 312 धावांचे तगडे आव्हान दिले. अष्टपैलू बेन स्टोक्सने त्यात 57 चेंडूत जलद नाबाद 78 धावांची आतषबाजी केली.
प्रत्युत्तरात, विजयासाठी 312 धावांचा पाठलाग करताना विंडीजची आघाडी फळी अगदीच स्वस्तात गारद झाली. कॅम्पबेल (4), ब्रेथवेट (12) व शाय होप (7) हे आघाडीचे 3 फलंदाज तर अवघ्या 23 धावांमध्येच गारद झाले. स्टुअर्ट ब्रॉडने रोस्टन चेसला पायचीत केले, त्यावेळी विंडीजचा संघ 4 बाद 37 असा आणखी अडचणीत आला. ब्रूक्स (125 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 60) व ब्लॅकवूड (88 चेंडूत 7 चौकारांसह 55) यांनी पाचव्या गडय़ासाठी 100 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. पण, येथेही बेन स्टोक्सच इंग्लंडच्या मदतीला धावून आला आणि त्याने ब्लॅकवूडला बाद करत ही जोडी फोडली.
चहापानासाठी खेळ थांबवला जाण्यापूर्वी अगदी शेवटच्या चेंडूवर त्याने हे यश मिळवून दिले. वास्तविक, ओल्ड ट्रफोर्डवरील या लढतीत विंडीजची आघाडी फळी ज्या वेगाने कापली गेली, ते पाहता, त्यांच्याकडून काही प्रतिकार होईल का, याबाबतच साशंकता निर्माण झाली होती. पण, याचवेळी ब्लॅकवूड व ब्रुक्स यांची जोडी क्रीझवर जमली होती. या जोडीने अर्थातच सावध पवित्र्यावर अधिक भर देत 100 धावांची संयमी भागीदारी साकारली होती.
या उभयतांनी इंग्लिश गोलंदाजांकडून खराब चेंडू टाकले जाण्याची प्रतीक्षा करण्यावर अधिक भर दिला. पण, नंतर प्रथम ब्लॅकवूड व नंतर ब्रूक्स बाद झाल्याने विंडीजचा संघ पुन्हा अडचणीत आला आणि अंतिमतः त्यांना यातून सावरताच आले नाही. विंडीजचा यष्टीरक्षक-फलंदाज शेन डॉरिच त्यापूर्वी खातेही उघडण्यापूर्वीच बाद झाला होता. इंग्लिश संघातर्फे जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने सर्वात भेदक मारा करत 42 धावात 3 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : 9-469 वर घोषित, विंडीज पहिला डाव : सर्वबाद 287. इंग्लंड दुसरा डाव : 3-129 वर घोषित. ाविंडीज दुसरा डाव (टार्गेट 312) : 70.1 षटकात सर्वबाद 198. (शमरह ब्रूक्स 136 चेंडूत 62, ब्लॅकवूड 88 चेंडूत 55, ब्रॉड 3-42, वोक्स 2-34, बेस 2-59, बेन स्टोक्स 2-30).