यजमानांचा एकतर्फी मालिकाविजय, डी कॉक सामनावीर-मालिकावीर
वृत्तसंस्था/ केपटाऊन
मालिकेत प्रथमच रोमांचक ठरलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने डी कॉकचे शतक, डय़ुसेनचे अर्धशतक आणि फेहलुक्वायो व एन्गिडी यांच्या भेदक माऱयाच्या बळावर भारताचा 4 धावांनी पराभव करून तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. डी कॉकला सामनावीर व मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले.
दक्षिण आफ्रिकेने तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात प्रथम खेळताना 49.5 षटकांत सर्व बाद 287 धावा जमवित भारताला 288 धावांचे आव्हान दिले. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णाने 3 बळी मिळविले. त्यानंतर भारताने 49.2 षटकांत सर्व बाद 283 धावा जमविल्या. शिखर धवन (61) व विराट कोहली (65) यांच्या अर्धशतकानंतर भारताची स्थिती 43 व्या षटकात 7 बाद 223 अशी झाली होती. पण दीपक चहरने फलंदाजीत चमक दाखवत 34 चेंडूत 54 धावा फटकावताना बुमराहसमवेत 45 धावांची भर घालत भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली होती. पण 278 धावसंख्येवर तो बाद झाल्यानंतर चहल, बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यांना उर्वरित दहा धावा जमविण्यात अपयश आले. 12 चेंडूत 8 धावांची गरज असताना बुमराह 49 व्या षटकात बाद झाला. या षटकात 2 धावा निघाल्या. शेवटच्या 6 चेंडूत 6 धावांची गरज असताना या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव निघाली. पण दुसऱया चेंडूवर चहल झेलबाद झाल्याने भारताचा डाव संपुष्टात आला. द.आफ्रिकेच्या फेहलुक्वायो व एन्गिडी यांनी प्रत्येकी 3, प्रेटोरियसने 2, मगाला व केशव महाराज यांनी एकेक बळी मिळविला.
द.आफ्रिकेची खराब सुरुवात
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱयाच षटकात दीपक चहरने फॉर्ममध्ये असलेल्या जानेमन मलानला एका धावेवर बाद केले. डी कॉकने आधीच्या सामन्यातील जोम कायम ठेवत जलदगतीने धावा जमविल्या. मात्र सहाव्या षटकात त्यांचा कर्णधार तेम्बा बवूमा 8 धावा काढून बाद झाला. केएल राहुलने त्याला थेट फेकीवर धावचीत केले. 2 बाद 34 अशा स्थितीनंतर डी कॉक व मॅरक्रम यांनी 10 षटकांत 2 बाद 53 अशी मजल मारली. दीपक चहरला सलग सात षटके देण्याचा राहुलचा निर्णय यशस्वी ठरला. चहरने मॅरक्रमला 15 धावांवर बाद केल्यानंतर 3 बाद 70 अशी त्यांची स्थिती झाली. बदली खेळाडू रुतुराज गायकवाडने हा झेल टिपला.
डी कॉकने व्हान डर डय़ुसेनच्या साथीने मोठी भागीदारी करीत संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली. पंतने डय़ुसेनला 12 धावांवर जीवदान दिले. जोडीदार बाद होत असताना डी कॉकने मात्र 59 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि संघाचे शतक 20 व्या षटकात फलकावर लागले. यानंतर डी कॉकने भारतीय गोलंदाज चहल व पी. कृष्णा यांच्यावर हल्ला चढवित चौकार वसूल करीत शतकाजवळ झेप घेतली. डय़ुसेन-डी कॉक जोडीने चौथ्या गडय़ासाठी शतकी भागीदारी नोंदवत 30 षटकाअखेर 3 बाद 170 धावांची मजल मारली. नंतर डी कॉकने 17 वे वनडे व शतक पूर्ण केले. भारताविरुद्ध त्याचे हे 17 व्या डावातील सहावे शतक असून त्याने भारताविरुद्ध सर्वाधिक शतके नोंदवणाऱया एबी डीव्हिलिर्स व रिकी पाँटिंग यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. डय़ुसेनने 10 वे वनडे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर 35 व्या षटकात संघाचे द्विशतक फलकावर लागले.
बुमराहने ही जोडी फोडताना डी कॉकला सीमारेषेनजीक धवनकरवी बाद केले. त्याने 130 चेंडूत 144 12 चौकार, 2 षटकार मारताना डय़ुसेनसमवेत 144 धावांची भागीदारी केली. पुढच्याच षटकात चहलने डय़ुसेनला झेलबाद केले. डीपमध्ये श्रेयस अय्यर त्याचा अप्रतिम झेल टिपला. डय़ुसेनने 59 चेंडूत 52 धावा जमविल्या. भारताने यावेळी किफायतशीर गोलंदाजी केल्याने द.आफ्रिकेला 40 षटकांत 228 धावांपर्यंत मजल मारता आली. फेहलुक्वायो धावचीत झाल्यानंतर मिलर व प्रेटोरियस यांनी 44 धावांची आक्रमक भागीदारी केली. पी. कृष्णाने प्रेटोरियसला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. बुमराहने नंतर केशव महाराजला बाद केल्यानंतर शेवटच्या षटकात पी. कृष्णाने मिलर व सिसांदा मगाला यांना बाद करीत 287 धावांत त्यांचा डाव संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक ः द.आफ्रिका 49.5 षटकांत सर्व बाद 287 ः डी कॉक 130 चेंडूत 12 चौकार, 2 षटकारांसह 124, डय़ुसेन 59 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 52, मॅरक्रम 15, मिलर 38 चेंडूत 39, प्रेटोरियस 25 चेंडूत 20, अवांतर 18. गोलंदाजी ः पी. कृष्णा 3-59, बुमराह 2-52, दीपक चहर 2-53, चहल 1-47.
भारत 49.2 षटकांत सर्व बाद 283 ः केएल राहुल 9, धवन 73 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 61, कोहली 84 चेंडूत 5 चौकारांसह 65, पंत 0, श्रेयस अय्यर 34 चेंडूत 26, सूर्यकुमार यादव 32 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 39, दीपक चहर 34 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 54, जयंत यादव 2, बुमराह 12, चहल 2, पी.कृष्णा नाबाद 2, अवांतर 11. गोलंदाजी ः फेहलुक्वायो 3-40, एन्गिडी 3-58, प्रेटोरियस 2-54, सिसांदा मगाला 1-69, केशव महाराज 1-39.