अंतिम लढतीत प्लिस्कोव्हावर एकतर्फी विजय
वृत्तसंस्था/ रोम
पोलंडची युवा टेनिसपटू इगा स्वायटेकने झेकच्या नवव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा एकतर्फी धुव्वा उडवित इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले.
19 वर्षीय स्वायटेक ही विद्यमान पेंच ओपन चॅम्पियन असून केवळ 45 मिनिटांत तिने प्लिस्कोव्हाचा 6-0, 6-0 असा फडशा पाडला. प्लिस्कोव्हाने 2019 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असणाऱया स्वायटेकचे हे तिसरे डब्ल्यूटीए जेतेपद आहे. याआधी तिने प्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर गेल्या जानेवारीत तिने ऍडलेड स्पर्धाही जिंकली होती. येथे तिने पहिला सेट केवळ 20 मिनिटात संपवला. त्यात प्लिस्कोव्हाला केवळ चार गुण मिळविता आले. दुसऱया सेटमधील तिसऱया गेममध्ये प्लिस्कोव्हाने लढत देण्याचा प्रयत्न केला आणि तिने आघाडीही घेतली. पण स्वायटेकने नंतर तिला संधीच दिली नाही. प्लिस्कोव्हा सलग तिसऱयांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होती. गेल्या वर्षी दुखापतीमुळे तिने अंतिम सामन्यातून माघार घेतल्याने सिमोना हॅलेपला जेतेपद मिळाले होते.
त्याआधी शनिवारी एका दिवसात स्वायटेकने दोन सामने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने स्विटोलिनाचा 6-2, 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर तिने अमेरिकेच्या 17 वर्षीय कोको गॉफवर 7-6 (7-3), 6-3 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. प्लिस्कोव्हाने उपांत्य फेरीत मार्टिकचा 6-1, 3-6, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.