किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : रोशनी तीर्थहळ्ळी हिने नीट परीक्षेत मिळविला 103 वा क्रमांक
प्रतिनिधी /बेळगाव
जीएसएस पीयू कॉलेजची विद्यार्थिनी रोशनी तीर्थहळ्ळी हिने नीट परीक्षेत 103 वा क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल एसकेई सोसायटीतर्फे चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना किरण ठाकुर म्हणाले तिचे नावच रोशनी असल्याने तिने कुटुंबाचे नाव रोशन केले. यावेळी तिच्या पालकांचाही संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सेक्रेटरी आर. बी. देशपांडे, आर.पी.डी. कॉलेजचे व्हाईस चेअरमन डी. बी. कलघटगी यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रणव पित्रे यांनी केले.
किरण ठाकुर पुढे म्हणाले, देशाला आणि शिक्षण क्षेत्राला रोशनीसारख्या विद्यार्थ्यांची गरज आहे. भारतीय डॉक्टर हे जगामध्ये प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या कौशल्यामुळे. तसा विश्वासही त्यांनी निर्माण केला आहे. कोरोनाकाळात तर ते देवदूतच ठरले आहेत. कारण या काळात काहींना रुग्णांची सेवा करताना स्वतःचे प्राण गमवावे लागले आहेत. डॉक्टर प्रत्येक पेशंट जगविण्याचा प्रयत्न करतात. पण काही वेळा रुग्ण दगावतो. याकडे समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे.
देशातील अनेक कारखाने, उद्योगधंदे तीन शिफ्टमध्ये चालतात. शिक्षण क्षेत्रातही याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थी सोयीनुसार शिक्षण घेऊ शकतात, असेही ते म्हणाले. त्यांनी रोशनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रोशनी ही स्वयंप्रेरित आणि अभ्यासू विद्यार्थिनी आहे. त्यामुळे ती हे यश प्राप्त करू शकली, असे लता कित्तूर यांनी सांगितले. रोशनीचे वडील डॉ. तेजस्वी तीर्थहळ्ळी यांनी सर्व शिक्षकांनी केलेले सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.