प्रतिनिधी / म्हापसा :
भाजपाचे प्रदेश प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांना धमकावल्याप्रकरणी सर्व साक्षीदारांचे म्हणणे विचारात घेऊन रोहन खंवटे यांच्या विरोधात 30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात यावे अशी मागणी पर्वरी गटाध्यक्ष ऍड. शंकर फडते यांनी केली आहे.
आमदार खंवटे यांना याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केल्याच्या तसेच नंतर त्यांची जामीनावर मुक्तता झाल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसच्या म्हापसा येथील कार्यालयात पर्वरी गट काँग्रेसचे अध्यक्ष शंकर फडते यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, रोहन खंवटे हे सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत. विधानसभा आवारात त्यांच्याकडून घडलेल्या कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो.
खंवटे यांचा तसेच त्यांच्या समर्थकांचा विविध गैरप्रकारात हात असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप असून सरकारने ज्या तत्परतेने या प्रकरणात कारवाई केली त्याच तत्परतेने इतरही प्रकरणांत कारवाई करावी अशी मागणी श्री. फडते यांनी केली. विशेषतः सेरुला कोमुनिदाद गैरव्यवहार प्रकरणात त्यांचा तसेच त्यांच्या पाठिराख्यांचा मोठय़ा गैरव्यवहारात सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. विधानसभेसारख्या पवित्र ठिकाणी खंवटे यांच्याकडून जी कृती घडली ती अशोभनीय असल्याचे नमूद करून विधानसभा सुरू असताना खंवटे यांच्यावर कारवाई करणे योग्य नव्हे. अधिवेशन संपल्यानंतर ती कारवाई करता आली असती असेही मत व्यक्त केले आहे. म्हांबरे यांना धमकावल्याप्रकरणी नावापुरती कारवाई करू नये तर सखोल चौकशीअंती गांभीर्याने कारवी करावी असेही ते म्हणाले.