वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या टाटा पुरस्कृत खुल्या महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांनी ऑस्ट्रेलियाच्या सेव्हेली आणि जॉन स्मिथ यांचा पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. आगामी डेव्हिस चषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या जेतेपदामुळे भारतीय संघाचे मनोबल निश्चितच उंचावणार आहे.
बालेवाडीतील क्रीडा सकुंलात झालेल्या टाटा पुरस्कृत महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रोहन बोपण्णा व रामकुमार रामनाथन यांनी ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड सेव्हेली आणि जॉन पॅट्रीक स्मिथ यांचा 6-7, 6-3, 10-6 असा पराभव केला.
एटीपी टूरवरील या स्पर्धेत पुरूष दुहेरीचे जेतेपद बोपण्णा आणि रामकुमार या जोडीने पटकाविल्याने आता पुढील महिन्यात होणाऱया डेन्मार्कविरूद्ध डेव्हिस चषक विश्व गट-1 प्ले ऑफ लढतीत भारतीय संघ नव्या उमेदीने कोर्टवर उतरु शकेल. भारतीय डेव्हिस संघामध्ये बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांचा समावेश आहे. सदर डेव्हिस चषक लढत दिल्ली जिमखाना क्लबच्या ग्रासकोर्टवर 4-5 मार्च रोजी खेळविली जाणार आहे. एटीपी टूरवरील स्पर्धेतील बोपण्णा आणि रामकुमार यांचे दुहेरीतील हे पहिले विजेतेपद आहे. दुहेरीच्या मानांकनात रामकुमार 94 व्या तर बोपण्णा 35 व्या स्थानावर आहे.
डेन्मार्कविरूद्ध होणाऱया डेव्हिस चषक विश्व गट-1 प्ले ऑफ लढतीसाठी भारतीय संघात युकी भांब्री, पी. गुणेश्वरन, डी. शरण, रामकुमार रामनाथन आणि रोहन बोपण्णा यांचा समावेश आहे. रोहित राजपाल संघाचा बहिस्थ कर्णधार असून झिशान अली प्रमुख प्रशिक्षक आहे. 1984 नंतर प्रथमच भारत आणि डेन्मार्क यांच्यात डेव्हिस चषक स्पर्धेत लढत होत आहे. 1984 साली उभय संघात डेन्मार्क मध्ये झालेल्या लढतीत भारताने 3-2 अशा फरकाने विजय मिळविला होता.