वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर जाणाऱया भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी उपकर्णधारपदासाठी रोहित शर्माची निवड करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेतील ओमीक्रॉन व्हेरियंट कोरोनाचा प्रसार सुरू झाल्याने भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा नऊ दिवसांनी लांबणीवर टाकण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळ तसेच दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने घेतला आहे. आता भारतीय क्रिकेट संघ या दौऱयात आपला पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरला (बॉक्सिंग डे) खेळणार आहे. यापूर्वी उभय संघातील पहिली कसोटी 17 डिसेंबरला खेळविली जाणार होती.
भारतीय कसोटी संघातील अजिंक्य रहाणे फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र अलिकडे पाहावयास मिळत असल्याने भारतीय निवड समितीने कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपविण्याची शक्यता आहे. भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे यापूर्वीच सोपविण्यात आले होते. भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा लांबणीवर पडल्याने उभय संघांतील टी-20 मालिका कदाचीत रद्द करण्यात येणार आहे. या दौऱयात दोन कसोटी आणि तीन वनडे सामने खेळविण्याबबत दोन्ही क्रिकेट मंडळामध्ये चर्चा सुरू आहे.