इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी, तिसरा दिवस- चहापानाअखेर भारत 1 बाद 199
लंडन / वृत्तसंस्था
रोहित शर्माने तंत्रशुद्ध व संयमी फलंदाजीचे समयोचित दर्शन घडवत दमदार शतक झळकावल्यानंतर भारताने यजमान इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी चहापानाअखेर 1 बाद 199 धावांची मजल मारली. पहिल्या दोन्ही सत्रात भारताने उत्तम वर्चस्व गाजवले. रोहित शर्मासाठी विदेशी भूमीतील हे पहिलेवहिले शतक ठरले. कसोटी कारकिर्दीत त्याचे हे एकूण आठवे शतक आहे.
फलंदाजीला उत्तम अशा ओव्हलच्या खेळपट्टीवर चहापानाअखेर भारताने 100 धावांची आघाडी मिळवली. चेतेश्वर पुजाराने (97 चेंडूत 48) आक्रमक पवित्र्यावर भर देत दुसऱया गडय़ासाठी रोहित शर्मासमवेत 116 धावांची अभेद्य भागीदारी साकारली आणि यामुळे भारताचे या सामन्यावर बऱयापैकी वर्चस्व प्रस्थापित होत राहिले.
आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱया रोहितने (218 चेंडूत नाबाद 103) या मालिकेत सॉलिड डिफेन्सचा उत्तम दाखला दिला असून मोईन अलीला ओव्हल स्टॅण्ड्सच्या सेकंड टायरकडे षटकारासाठी पिटाळून लावत अगदी थाटात कसोटी कारकिर्दीतील 8 वे शतक साजरे केले. त्याचे शतक साजरे होताच बाल्कनीतील विराट कोहलीचे प्रफुल्लित स्मित हास्य बरेच काही सांगून गेले.
रोहितला विदेशात पहिले शतक झळकावण्यासाठी 8 वर्षे व 43 कसोटी सामन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. मात्र, येथे इंग्लंडच्या प्रतिकूल वातावरणात व संघाला अतिशय निकडीची गरज असताना त्याची फलंदाजी बहरली. यामुळे, 8 कसोटी शतकांमध्ये त्याचे हे शतक सर्वोत्तम ठरत असल्यास त्यात आश्चर्याचे कारण नसेल.
दिवसाच्या प्रारंभी, केएल राहुलने (46) अधिक आक्रमक पवित्रा घेतला. दुसरीकडे, रोहितने स्ट्रेट ड्राईव्ह व ऑन ड्राईव्हचे दमदार फटके लगावत त्याने आपले इरादे स्पष्ट केले आणि नंतरही हा धडाका कायम राखला. रोरी बर्न्सने रोहितला आणखी एक जीवदान दिले आणि याचाही त्याने उत्तम लाभ घेतला.
केएल राहुलला अँडरसनने यष्टीमागे बेअरस्टोकरवी झेलबाद केले असले तरी तिसऱया स्थानी उतरलेल्या चेतेश्वर पुजाराने आपल्या आक्रमक खेळीसह इंग्लिश संघाला आणखी स्तिमित करुन सोडले. स्क्वेअर कट, लेट कट व रॅम्प शॉटचा धडाका लावत पुजाराने धावफलक सातत्याने हलता राहील, याचीही उत्तम तजवीज केली.
प्रारंभी, राहुलने रॉबिन्सनला कव्हर ड्राईव्हचा चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली व नंतर एक षटकारही वसूल केला. एकदा रॉबिन्सनच्या गोलंदाजीवरच केएल राहुलला पायचीत दिले होते. पण, राहुलने डीआरएस घेतला आणि यात तो नाबाद असल्याचे स्पष्ट झाले होते.
धावफलक (चहापानाअखेर)
भारत पहिला डाव ः सर्वबाद 191
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 290.
भारत दुसरा डाव ः रोहित शर्मा नाबाद 103 (218 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), केएल राहुल झे. बेअरस्टो, गो. अँडरसन 46 (101 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), चेतेश्वर पुजारा नाबाद 48 (97 चेंडूत 7 चौकार). अवांतर 2. एकूण 69 षटकात 1 बाद 199.
गडी बाद होण्याचा क्रम
1-83 (केएल राहुल, 36.3).
गोलंदाजी
जेम्स अँडरसन 18-5-40-1, ओलि रॉबिन्सन 16-2-50-0, ख्रिस वोक्स 17-4-37-0, क्रेग ओव्हर्टन 7-0-27-0, मोईन अली 11-0-45-0.
रोहितची कसोटीतील 8 शतके
धावा / स्ट्राईक रेट / प्रतिस्पर्धी / ठिकाण / वर्ष
212 / 83.13 / द. आफ्रिका / रांची / 2019
177 / 58.80 / विंडीज / कोलकाता / 2013
176 / 72.13 / द. आफ्रिका / विशाखापट्टणम / 2019
161 / 69.69 / इंग्लंड / चेन्नई / 2021
127 / 85.23 / द. आफ्रिका / विशाखापट्टणम / 2019
111* / 87.40 / विंडीज / मुंबई / 2013
102* / 63.75 / श्रीलंका / नागपूर / 2017
100* / 48.80 / इंग्लंड / ओव्हल / 2021