वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत राष्ट्रीय विजेता रोहित चमोलीने तसेच भरत जूनने भारताला सुवर्णपदके मिळवून दिली. रविवारी 48 किलो वजनगटात रोहितने मंगोलियाच्या टुव्हेशिनझेयाचा पराभव केला. 81 किलो वरील गटात भरत जूनने कझाकस्तानच्या शेरीपबेकचा 5-0 असा पराभव केला.
48 किलो वजनगटातील झालेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत रोहितने मंगोलियाच्या टुव्हेशिनझेयाचा 3-2 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 70 किलो वजनगटात भारताच्या गौरव सैनीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उझ्बेकच्या शेवकेटॉनने सैनीचा अंतिम लढतीत 5-0 असा पराभव केला. महिलांच्या विभागात भारताच्या मुस्कान (46 किलो), विशु राठी (48 किलो), तानु (52 किलो), अंचल सैनी (57 किलो), निकिता (60 किलो), माही राघव (63 किलो), रूद्रिका (70 किलो), प्रांजल यादव (75 किलो), संजना (81 किलो) आणि कीर्ती (81 किलो वरील) यांनी अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत कनिष्ठ विभागात भारताने यापूर्वीच सहा कास्यपदके मिळविली आहेत. मुलींच्या विभागात देविका घोरपडे (50 किलो), आरझु (54 किलो), सुप्रिया रावत (66 किलो) यांना उपात्य फेरीत हार पत्करावी लागली. तसेच मुलांच्या विभागात भारताच्या आशिश (54 किलो), अनशुल (57 किलो) आणि अंकुश (66 किलो) यांना कास्यपदके मिळाली.