पुणे \ ऑनलाईन टीम
. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांची थेट तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी व नड्डांकडे केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी आता एक फोटो ट्वीट करत पडळकरांना महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी कशी? हे दाखवून दिले आहे. सध्या रोहित पवार यांच्या या ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ही महाराष्ट्राची खरी राजकीय संस्कृती आहे… काही जणांना ती समजून घेण्याची गरज आहे!, यासोबतच त्यांनी काही फोटो देखील शेअर देखील केले आहे. या एका ओळीच्या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची समज दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरात नवीन कार्यालय साकारलं आहे. या नवीन कार्यालयातून आता राष्ट्रवादीचं काम चालणार आहे. राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील या कार्यालास भाजपचे खासदार ते महापौरांपर्यंत सर्वांनी भेट दिली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. राजकारण बाजूला ठेऊन भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय गाठलं. कार्यालयाची पाहणी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी छान फोटोसेशन केलं. यातीलच काही फोटो रोहित पवार यांनी ट्विट केले आहेत.