पोटरीची दुखापत चिघळली, वनडेसाठी मयांक अगरवाल, कसोटीसाठी शुभमन गिल पाचारण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ, आघाडीवीर रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध आगामी वनडे व कसोटी मालिकेतून बाहेर फेकला गेल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. यजमान संघाविरुद्ध माऊंट मॉन्गनुई येथे झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यादरम्यान रोहितला पोटरीची दुखापत झाली होती व याच दुखापतीमुळे तो उर्वरित मालिकेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. भारतीय संघ न्यूझीलंड दौऱयात अद्याप 3 वनडे व 2 कसोटी सामने खेळणार आहे.
यापूर्वी, रविवारी झालेल्या पाचव्या व शेवटच्या टी-20 लढतीत रोहितने 41 चेंडूत 60 धावांची जलद आतषबाजी केली. त्यानंतर त्याला पोटरीची दुखापत झाली होती. भारताने तो सामना जिंकत 5-0 असा किवीज संघाला व्हॉईटवॉश दिला. पण, त्यानंतर रोहितच्या दुखापतीचे स्वरुप स्पष्ट झाले.
‘संघाचे फिजीओ रोहितवर लक्ष ठेवून आहेत. पण, तो उर्वरित दौऱयात खेळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्याची गैरहजेरी संघाला निश्चितपणाने जाणवेल’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिली वनडे बुधवारी खेळवली जाणार आहे.
वनडे मालिकेत रोहितची जागा मयांक अगरवाल घेईल. तो केएल राहुल व पृथ्वी शॉ यांच्यानंतर तिसरा सलामीवीर या नात्याने संघात असेल, असे सध्याचे संकेत आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मयांक अगरवाल पसंतीचा ठरत आला असून विंडीजविरुद्ध शिखर धवन गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असताना त्यावेळी मयांकच राखीव सलामीवीर होता.
कसोटी संघात शुभमन गिल पर्यायी सलामीवीर असेल. तेथे केएल राहुल व पृथ्वी शॉ नियमित सलामीवीराच्या भूमिकेत असतील, असे संकेत आहेत. भारताने खेळलेल्या मागील दोन कसोटी मालिकेत (दक्षिण आफ्रिका व बांगलादेशविरुद्ध) गिल हा रोहित व अगरवाल यांच्यासाठी पर्यायी सलामीवीर या नात्याने संघात होता. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध अनिर्णीत कसोटी सामन्यात 83 व नाबाद 204 धावांची तडफदार खेळी साकारल्यानंतर त्याचे वरिष्ठ संघातील स्थान निश्चित झाले.
कसोटी मालिकेसाठी संघाची निवड होणे अद्याप बाकी आहे. मात्र, संघ जवळपास निवडला गेला असून त्याची औपचारिक घोषणा होणे अपेक्षित आहे. एमएसके प्रसाद यांच्या मावळत्या निवड समितीने पर्यायी खेळाडू निश्चित केले आहेत. पण, निवड समितीचे समन्वयक जय शाह हे खजिनदार अरुण धुमाल यांच्यासमवेत न्यूझीलंडकडे रवाना झाले असून नंतर निवडीची घोषणा होणे अपेक्षित आहे.