द. आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल हंगामी कर्णधार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी वनडे मालिकेतून देखील बाहेर फेकला गेला असून त्याच्या गैरहजेरीत केएल राहुल नेतृत्व भूषवणार आहे. रोहित शर्मा अद्याप धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे, हा बदल झाला. अष्टपैलू अक्षर पटेल व रविंद्र जडेजा हे देखील तंदुरुस्त नाहीत. त्यामुळे, त्यांचाही विचार झाला नाही. अनुभवी जलद गोलंदाज मोहम्मद शमीला या वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली. जलद गोलंदाज जसप्रित बुमराहला उपकर्णधारपदी नियुक्त केले गेले आहे.
‘रोहित शर्मा अद्याप तंदुरुस्त नाही. तो दुखापतीतून सावरत आहे आणि यामुळे आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही’, असे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा म्हणाले. भारत-द. आफ्रिका यांच्यातील 3 वनडे अनुक्रमे 19, 21 व 23 जानेवारी रोजी पार्ल व केपटाऊन येथे होणार आहेत.
भारतीय वनडे संघ ः केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रित बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.