विराट कोहलीला ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’चा बहुमान, बेन स्टोक्सला सर गारफिल्ड सोबर्स चषक पुरस्कार
दुबई / वृत्तसंस्था
भारताचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माला बुधवारी आयसीसीचा 2019 मधील सर्वोत्तम वनडे खेळाडू पुरस्कार घोषित करण्यात आला. भारतीय कर्णधार विराट कोहलीला ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ पुरस्कार जाहीर केला गेला. विश्वचषक लढतीत स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवणाऱया चाहत्यांना त्याने रोखण्याचा प्रयत्न केला होता. याची या पुरस्कारात दखल घेण्यात आली. स्मिथ त्यावेळी एक वर्षाचे निलंबन पूर्ण करुन पुनरागमन करत होता.
इंग्लंडचा आयसीसी विश्वचषक जेता अष्टपैलू बेन स्टोक्सला सर गारफिल्ड सोबर्स चषक हा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला तर ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्सची वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून वर्णी लागली.
भारताचा युवा जलद गोलंदाज दीपक चहरने वर्षातील सर्वोत्तम टी-20 प्रदर्शनाबद्दल पुरस्कार जिंकला. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशाने वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरला तर स्कॉटलंडचा काईल कोएत्झरला सर्वोत्तम असोसिएट क्रिकेटपटू म्हणून जाहीर केले गेले.
32 वर्षांच्या रोहित शर्माने गतवर्षी इंग्लंडमध्ये संपन्न झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत 9 सामन्यात 81.00 च्या धडाकेबाज सरासरीने 648 धावांची आतषबाजी केली. यात 5 धुवांधार शतकांचा व एका अर्धशतकाचा समावेश राहिला. विश्वचषकाच्या कोणत्याही एकाच आवृत्तीत पाच शतके झळकावणाराही तो पहिलाच फलंदाज ठरला. वनडे क्रिकेट प्रकारात त्याने वर्षाच्या कालावधीत खेळलेल्या 28 सामन्यात 7 शतकांसह 1409 धावांचे योगदान दिले.
‘वर्षभरातील योगदानाची अशा पद्धतीने दखल घेतली जाणे अर्थातच स्वागतार्ह आहे. 2019 मध्ये आम्ही संघ या नात्याने जे प्रदर्शन केले, ते समाधानाचे आहे. पण, अद्याप आम्ही काही सुधारणा निश्चितच करु शकलो असतो. 2020 मध्ये त्यापेक्षा सरस कामगिरी साकारण्याचे लक्ष्य असेल’, असे रोहित याप्रसंगी म्हणाला.
बांगलादेशविरुद्ध नागपूरमधील लढतीत हॅट्ट्रिकसह 7 धावात 6 बळी घेतले, ती गोलंदाजी माझ्यासाठी नेहमीच संस्मरणात राहील, असे चहर म्हणाला. कसोटी क्रमवारीत वर्षअखेरीस अव्वलस्थानी राहिलेल्या कमिन्सने या कालावधीत 12 कसोटी सामन्यात 59 बळी घेतले असून त्याने आपल्या यशाचे श्रेय संघसहकाऱयांना दिले. बेन स्टोक्सने वर्ल्डकप फायनल व ऍशेस जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याचे प्रतिबिंब पुरस्कार निवडीत अपेक्षेप्रमाणे उमटले.
11 कसोटी सामन्यात 1104 धावा झळकावणारा लाबुशाने सर्वोत्तम पदार्पणपटूचा पुरस्कार जिंकणार, हे जवळपास निश्चित होते. विशेष म्हणजे या वर्षाच्या प्रारंभी तो आयसीसी मानांकन यादीत 110 व्या स्थानी होता. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस तो चौथ्या स्थानापर्यंत झेपावला आहे. इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे डेव्हिड शेफर्ड चषक हा वर्षातील सर्वोत्तम पुरस्कार जिंकणारे सातवे पंच ठरले.
आयसीसी क्रिकेट पुरस्कारांचे विजेते
वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी सर गारफिल्ड सोबर्स चषक : बेन स्टोक्स (इंग्लंड)
वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू : पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
वर्षातील सर्वोत्तम वनडे खेळाडू : रोहित शर्मा (भारत)
वर्षातील सर्वोत्तम टी-20 खेळी : दीपक चहर (भारत)
वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू : मार्नस लाबुशाने (ऑस्ट्रेलिया)
वर्षातील असोसिएट पुरस्कार : काईल कोएत्झर (स्कॉटलंड)
स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार : विराट कोहली
सर्वोत्तम पंचांसाठी डेव्हिड शेफर्ड पुरस्कार : रिचर्ड इलिंगवर्थ
विराट म्हणतो, हा पुरस्कार जिंकला, याचे मलाच आश्चर्य!
मागील कित्येक वर्षी मीच अनेकांच्या रडारवर होतो. त्यामुळे, हा पुरस्कार लाभला, याचे मलाच आश्चर्य वाटते. पण, लोकांनी थेट निवाडा देण्यावरच येऊ नये, असे मला मनापासून वाटते. हा खेळाडू असा, तो खेळाडू तसा, असे लेबल खेळाडूंच्या उमेदीच्या कालावधीत तरी लावू नका, असे आवाहन विराट कोहलीने केले.
आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील ओव्हलवर झालेल्या लढतीत उपस्थित चाहत्यांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली, त्यावेळी विराटने प्रेक्षकांना संयम राखण्याची विनंती केली होती. त्यासाठी विराटला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार जाहीर केला गेला.
‘प्रत्येक प्रतिस्पर्ध्याबद्दल आपल्याला आदर असायला हवा. पण, एखादा खेळाडू कठीण मानसिकतेतून, अवघड परिस्थितीतून बाहेर पडत असताना त्याची हुर्यो उडवणे योग्य ठरत नाही. त्यामुळे, मी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली जात होती, ते थांबवण्याचा प्रयत्न केला’, असे विराटने आयसीसीकडून जाहीर पत्रकातून नमूद केले.