वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट मंडळ व्यवस्थापनावर आपल्या मुलाखतीत टीका केल्याबद्दल लंकेच्या टी-20 संघातील खेळाडू भानुका राजपक्षेला क्रिकेट श्रीलंकेने दंड ठोठावला आहे. तसेच त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. 29 वर्षीय राजपक्षे येथील एका स्थानिक प्रसारमाध्यमाला मुलाखत देत असताना लंकेच्या राष्ट्रीय व्यवस्थापन समितीवर टीका केली. राजपक्षेने शिस्तपालन नियमाचा भंग केल्याने त्याला पाच हजार डॉलर्सचा दंड आणि त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय शिस्तपालन समितीने घेतला आहे. नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱयासाठी राजपक्षेला लंकन संघात स्थान देण्यात आले नव्हते. इंग्लंड दौऱयात लंकन संघाने वनडे आणि टी-20 मालिका गमावल्या आहेत. राजपक्षेने 2019 च्या ऑक्टोबरमध्ये पाकविरुद्ध आपल्या पहिल्या टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच त्यांने आपला शेवटचा सामना 2020 च्या जानेवारीमध्ये भारताविरुद्ध खेळला होता