वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयामध्ये उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने सिडनी क्रिकेट मैदानावर 11 आणि 13 फेब्रुवारीला खेळविले जाणार आहेत.
या मालिकेतील तिसरा सामना कॅनबेराच्या मनुका ओव्हल स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील शेवटचे दोन सामने मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविले जातील. 2019 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान झालेल्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने लंकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाण्यापूर्वी लंकन संघातील सर्व खेळाडूंना तसेच प्रशिक्षकवर्गातील सदस्यांना कोरोनाच्या दोन्ही लसी दिल्या जातील, अशी माहिती लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली आहे.