वृत्तसंस्था/ कोलंबो
पहिल्या लंका प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी 1 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या सुमारे 150 विदेशी क्रिकेटपटूंच्या लिलावामध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल, विंडीजचे ख्रिस गेल, डरेन सॅमी तसेच पाकचा माजी अष्टपैलू शाहीद आफ्रिदी यांचा समावेश आहे.
श्रीलंकेत पहिल्यांदा ही प्रिमियर लीग टी-20 स्पर्धा 14 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव 1 ऑक्टोंबरला आयोजित केला असून विदेशातील सुमारे दीडशेहे क्रिकेटपटू भाग घेणार आहेत. सदर स्पर्धा ऑगस्ट महिन्यात आयोजित केली होती पण कोरोना महामारी परिस्थितीमुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय लंकन क्रिकेट मंडळाने घेतला. क्रिकेटपटूंच्या लिलावामध्ये भारताचा मुनाफ पटेल, विंडीजचे ख्रिस गेल, डरेन सॅमी, पाकचा शाहीद आफ्रिदी, बांगलादेशचा शकीब अल हसन, विंडीजचा डरेन ब्रॅव्हो, इंग्लंडचा रवि बोपारा, न्यूझीलंडचा कॉलीन मुनेरो आणि दक्षिण आफ्रिकेचा फिलँडर सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत पाच फ्रांच्यायजीचे संघ भाग घेत आहेत.
37 वर्षीय मुनाफ पटेल 2018 साली क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला असून त्याने 13 कसोटी, 70 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व केले. 2006 साली मुनाफ पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून 2011 साली विश्वचषक जिंकणाऱया भारतीय संघातील तो एक सदस्य होता. अलिकडे त्याने संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या टी-10 लीग स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता.
लंका प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेत सहभागी होणाऱया संघांच्या प्रत्येक फ्रांच्यायजीला सहा विदेशी क्रिकेटपटू खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेत पाच संघामध्ये एकूण 30 विदेशी क्रिकेटपटू आणि 65 स्थानिक क्रिकेटपटूंना संधी दिली जाईल. प्रत्येक संघामध्ये 19 खेळाडू राहतील. या स्पर्धेतील सामने डंबुला, पल्लीकेली, हंबनटोटा येथे खेळविले जातील. हंबनटोटामध्ये या स्पर्धेचे उद्घाटन केले जाईल. या स्पर्धेत खेळणाऱया क्रिकेटपटूंना सात दिवसांसाठी क्वारंटाईनचा कालावधी राहील.