वृत्त संस्था/ पल्लीकेली
यजमान श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटीला येथे आजपासून (21 एप्रिल) प्रारंभ होणार आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेच्या मानांकनात आपले स्थान सुधारण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न राहतील.
आयसीसीच्या विश्व कसोटी सांघिक मानांकनात सध्या श्रीलंका आठव्या तर बांगलादेश नवव्या स्थानावर आहे. उभय संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी 29 एप्रिल ते 3 मे दरम्यान पल्लीकेली येथे खेळविली जाणार आहे. करूणारत्नेच्या नेतृत्वाखालील संकेचा संघ या आगामी मालिका जिंकून मानांकनातील आपले सथान सुधारण्यासाठी प्रयत्न करेल. बांगलादेशने ही आगामी मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली तर या संघाच्या मानांकनात थोडी सुधारणा होवू शकेल. लंकेने ही मालिका 2-0 अशी जिंकली किंवा ही मालिका बरोबरीत राखली तर लंकेला सहाव्या स्थानावर असलेल्या विंडीज संघाची बरोबरी साधता येईल.
विश्व कसोटी चॅम्पियन्सशीपच्या मोहिमेला लंकेने 2019 ऑगस्टमध्ये यशस्वी प्रारंभ करताना न्यूझीलंडचा 10 गडय़ांनी पराभव केला होता. त्यानंतर मात्र लंकेला फारसे यश मिळाले नाही. या स्पर्धेतील लंकेने एक सामना जिंकला तर एक सामना बरोबरीत राखला आणि एक सामना गमविला. त्यानंतर सलग पाच सामने लंकेने गमविले आहेत.