वृत्तसंस्था/ दुबई
लंकेचा माजी क्रिकेटपटू आणि गोलंदाज प्रशिक्षक नुआन झोयसावर मँच फिक्सिंग आरोपावरून यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता तो भ्रष्टाचारात दोषी ठरल्याची माहिती आयसीसीच्या प्रवक्त्याने दिली.
2018 च्या नोव्हेंबरमध्ये झोयसावर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी लवादाने झोयसावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता आयसीसीतर्फे स्वतंत्र लवादाची नियुक्ती करण्यात आली होती. या लवादासमोर झालेल्या सुनावणीमध्ये झोयसा तीन गुन्हय़ामध्ये दोषी आढळला. त्याने आयसीसीच्या शिस्तपालन नियमांचे उल्लंघन करून आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले. संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत झोयसाकडून आर्थिक भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणात झोयसाला आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी स्वतंत्र लवादाने दोषी ठरविले आहे. झोयसाने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 30 कसोटी आणि 95 वनडे सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व केले असून 2015 च्या सप्टेंबरमध्ये त्याची क्रिकेट लंकातर्फे गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.