वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा क्रिकेट संघ पुढील आठवडय़ात ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या दौऱयासाठी लंकन क्रिकेटपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यावेळी नवोदित वेगवान गोलंदाज नुवान तुषारा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
या दौऱयासाठी लंकेचा 20 जणांचा संघ निवडण्यात आला आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका 11 ते 20 फेब्रुवारी दरम्यान खेळविली जाणार आहे. लंकन संघामध्ये तुषाराचा समावेश यापूर्वीच करण्यात आला आहे. आता तुषाराला काही दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात येणार असून त्याची पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात येईल. याशिवाय लंकन संघातील ट्रेनर फोनसेका कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तुषारा आणि फोनसेका 10 फेब्रुवारीला लंकन संघात दाखल होतील.