वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
लंकेचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर असून उभय संघामध्ये कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील शनिवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत लंकेने पहिल्या डावात 3 बाद 212 धावा जमविल्या. लंकन संघातील दिनेश चंडिमल 50 धावावर खेळत आहे तर धनंजय डिसिल्व्हा 79 धावावर असताना दुखापतीमुळे निवृत्त झाला आहे.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. दक्षिण आफ्रिकेतील वेगवान खेळपट्टय़ावर यजमान संघाच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. पाचव्या षटकात लंकेचा कर्णधार करुणारत्ने निगेडीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 22 धावा जमविल्या. नॉर्जेने कुशल मेडिसला 12 धावावर झेलबाद केले. मुल्डेरने कुशल परेराला 16 धावावर तंबूचा रास्ता दाखविला. लंकेची स्थिती यावेळी 3 बाद 54 अशी केविलवाणी होती.
दिनेश चंडिमल आणि धनंजय डिसिल्व्हा यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 131 धावांची भागीदारी केली. लंकेची धावसंख्या 185 असताना धनंजय डिसिल्वा जखमी झाल्याने त्याने मैदान सोडले. डिसिल्वाने 79 धावा केल्या आहेत. चंडिमल आणि डिक्वेला या जोडीने खेळाच्या दुसऱया सत्रामध्ये संघाची पडझड होऊ दिली नाही. 52 षटकाअखेर लंकेने 3 बाद 212 धावा जमविल्या. चंडिमल 50 तर डिक्वेला 11 धावावर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे निगेडी, नॉर्जे आणि मुल्डेर यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव : 52 षटकात 3 बाद 212 (चंडिमल खेळत आहे 50, धनंजय डिसिल्वा दुखापतीमुळे निवृत्त 79, करुणारत्ने 22, कुशल परेरा 16, कुशल मेडिस 12, डिक्वेला खेळत आहे 11, निगेडी, नॉर्जे आणि मुल्डेर प्रत्येकी एक बळी).