साडेपाच तास किल्ला लढवत रविंद्र जडेजाची 175 धावांची धुवांधार खेळी
मोहाली / वृत्तसंस्था
दस्तुरखुद्द शेन वॉर्नने रॉकस्टार हे संबोधन दिलेल्या रविंद्र जडेजाने साडेपाच तास किल्ला लढवत 228 चेंडूत नाबाद 175 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम, धुवांधार खेळी साकारल्यानंतर भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. जडेजाच्या पावणेदोनशे धावांच्या धमाकेदार खेळीत 17 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला. प्रत्युत्तरात लंकेची दुसऱया दिवसअखेर 4 बाद 108 अशी बिकट स्थिती होती.
फलंदाजीत धडाकेबाज खेळी साकारल्यानंतर जडेजाने गोलंदाजीत देखील लक्षवेधी मारा साकारत 30 धावात 1 बळी घेतला. अश्विनने 21 धावात 2 तर जसप्रित बुमराहने 20 धावात 1 फलंदाज बाद केला. श्रीलंकेला या लढतीत फॉलोऑन टाळण्यासाठी अद्याप 267 धावांची आवश्यकता आहे.
रविंद्र जडेजा चौफेर फटकेबाजीच्या जोरावर द्विशतकाच्या उंबरठय़ावर जरुर पोहोचला. पण, त्याला किंवा अगदी संघव्यवस्थापनाला देखील द्विशतक पूर्ण होईतोवर डाव सुरु ठेवण्याची गरज वाटली नाही. जडेजा 175 धावांवर असताना भारताने डाव घोषित केला आणि लंकन फलंदाजांना शक्य तितक्या लवकर गुंडाळण्याच्या मोहिमेला प्राधान्य देणे पसंत केले.
शेवटच्या सत्रात अश्विनने (82 चेंडूत 61 धावा) कारकिर्दीतील 12 वे अर्धशतक साजरे केले आणि नंतर गोलंदाजीच्या आघाडीवर लहिरु थिरिमने व धनंजया डीसिल्व्हा यांना बाद करत सर रिचर्ड हॅडली यांचा 431 बळींचा विक्रम मागे टाकला. जडेजाने (1-30) नंतर श्रीलंकेचा सर्वोत्तम खेळाडू व कर्णधार दिमुथ करुणारत्नेला (28) पायचीत करत आणखी एक यश मिळवून दिले.
दोन सत्रात 217 धावांची बरसात
प्रारंभी, जडेजाच्या जोरदार फटकेबाजीमुळे भारताने पहिल्या दोन सत्रात 217 धावांची बरसात केली. वेगवान गोलंदाज लहिरु कुमारा धोंडशिरेच्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर लंकेच्या अडचणीत आणखी भर पडली. लहिरु कुमारा आपले 11 वे षटकही पूर्ण करु शकला नाही. तो उपलब्ध नसल्याने लंकेला युवा, अननुभवी लसिथ एम्बुल्डेनियावर (46-3-188-2) अवलंबून राहणे क्रमप्राप्त होते आणि या आघाडीवर देखील त्यांची निराशाच झाली.
जडेजाने एकंदरीत साडेपाच तास किल्ला लढवत 228 चेंडूंचा सामना केला आणि पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने 17 चौकार व 3 उत्तुंग षटकारही फटकावले होते. जडेजाने सातव्या गडय़ासाठी अश्विनसमवेत 130 तर मोहम्मद शमीसमवेत नवव्या गडय़ासाठी 103 धावांची भागीदारी साकारत लंकन गोलंदाजांची उत्तम धुलाई केली. शमी फलंदाजीला उतरल्यानंतर जडेजाने एकेरी धावा घेणे टाळत स्वतः स्ट्राईकवर राहण्याला प्राधान्य दिले आणि अर्धशतक, शतक व दीडशतक तलवारबाजीच्या स्टाईलने साजरे करत त्याने उपस्थितांची वाहवा मिळवली.
धावफलक भारत पहिला डाव ः मयांक अगरवाल पायचीत गो. एम्बुल्डेनिया 33 (49 चेंडूत 5 चौकार), रोहित शर्मा झे. लकमल, गो. कुमारा 29 (28 चेंडूत 6 चौकार), हनुमा विहारी त्रि. गो. फर्नांडो 58 (128 चेंडूत 5 चौकार), विराट कोहली त्रि. गो. एम्बुल्डेनिया 45 (76 चेंडूत 5 चौकार), रिषभ पंत त्रि. गो. लकमल 96 (97 चेंडूत 9 चौकार, 4 षटकार), श्रेयस अय्यर पायचीत गो. डीसिल्व्हा 27 (48 चेंडूत 3 चौकार), रविंद्र जडेजा नाबाद 175 (228 चेंडूत 17 चौकार, 3 षटकार), रविचंद्रन अश्विन झे. डिकवेला