प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यातील लऊळ शिवारात शिराळ रस्त्यावरील चवसी वस्तीनजीक सुमारे 35 ते 37 वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचा तिक्ष्ण हत्याराने निघृण खून करुन त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार 17 रोजी दुपारी 11.15 वा च्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, लऊळचे पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे यांनी चवसी वस्तीनजीक अनोळखी व्यक्तीचा अर्धवट अवस्थेतील जळालेला मृतदेह असल्याची माहिती कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात कळविली. त्यानंतर सहा.पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ.विशाल हिरे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना घटनास्थळी अनोळखी साडे पाच फूट उंच व्यक्तीचा जळालेला मृतदेह दिसून आला. परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. मृत व्यक्तीच्या डोक्यावर, तोंडावर, गळ्यावर, पोटावर व पायावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा व डाव्या हाताची तीन बोटे नसल्याचे पोलिसांना प्रथम दर्शनी दिसून आले. त्याचे कपडे, बेल्ट व सुमारे पंचवीस ते तीस हजारांच्या 500 च्या नोटा अर्धवट जळालल्या स्थितीत आढळून आल्या, तसेच भरलेली काडेपेटी आदी साहित्य घटनास्थळावर दिसले. त्यानंतर त्यांनी तो मृतदेह उचलून बालाजी कोळेकर यांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात आणला. उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ.विशाल हिरे यांनी नियंत्रण कक्षाद्वारे इतर पोलीस ठाण्यातील मिसिंगच्या नोंदी तपासण्याचे काम सुरु केले. परंतू सायंकाळपर्यंत त्यांचा तपास सुरुच होता. हिवाळ्याच्या दिवसामध्ये संबंधित मृतदेहाच्या जखमेत आळ्या व मुंग्या लागल्याने ही घटना सुमारे तीन दिवसापूर्वी घडली असल्याचे पोलिसांचा अंदाज आहे. याबाबत कुर्डुवाडी पोलिसांत अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
सदर मयताच्या अंगावर निळा चौकटी शर्ट व काळी पँट अर्धवट जळेलेली असून त्याच्या डाव्या हाताचा अंगठा व करंगळीमधील तीन बोटे नाहीत. सदर व्यक्तीबद्दल कोणास काही माहिती असल्यास कुर्डुवाडी पोलिसांत संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ.विशाल हिरे यांनी केले आहे.