शारजातील दोन्ही सामने जिंकल्याने राजस्थानला विजयाची आशा
वृत्तसंस्था/ शारजा
बलाढय़ दिल्ली कॅपिटल्सला रोखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला शुक्रवारी होणाऱया आयपीएलमधील सामन्यात आपल्या संघातील त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्या लागणार आहेत. याशिवाय सलग तीन पराभवाची मालिकाही खंडित करावी लागणार आहे. सायंकाळी 7.30 पासून हा सामना सुरू होईल.
शारजा हे राजस्थान रॉयल्ससाठी लकी मैदान ठरले असून येथे झालेले दोन्ही सामने त्यांनी जिंकून शानदार सुरुवात केली होती. मात्र दुबई व अबु धाबीमधील मोठय़ा मैदानावर जुळवून घेण्यासाठी त्यांना झगडावे लागल्याने त्यांना सलग तीन पराभव स्वीकारावे लागले आहेत. आता त्यांच्या आवडत्या मैदानावर सामना होत असल्याने दिल्लीची घोडदौड रोखण्यासाठी ते निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, अशी अपेक्षा आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने तिन्ही विभागात भक्कम प्रदर्शन करीत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत.
राजस्थानसाठी वेळ निसटत चालली असल्याने सर्वोत्तम अंतिम संघ निवडण्याची त्यांना घाई करावी लागणार आहे. अष्टपैलू बेन स्टोक्सच्या पुनरागमनाने त्यांची बाजू थोडी भक्कम होऊ शकते. पण सध्या तो क्वारंटाईनमध्ये असल्याने शुक्रवारच्या सामन्यात तो सहभागी होऊ शकत नाही. 11 ऑक्टोबरनंतरच तो खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. पहिल्या दोन सामन्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी जबरदस्त प्रदर्शन केल्यामुळे राजस्थानला विजय मिळविता आला होता. पण अचानक त्यांचा फॉर्म हरविल्यामुळे तसेच संघातील भारतीय खेळाडूंकडून फारसे योगदान होत नसल्याने त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजाला तसेच वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी व अंकित राजपूत यांना संधी देत संघरचनेत बदल केला होता. पण जैस्वाल दुसऱयाच चेंडूवर शून्यावर बाद झाला तर राजपूतने 3 षटकांत 42 धावा दिल्या. त्यागीने मात्र 36 धावांत 1 बळी घेत थोडीफार आश्वासक कामगिरी केली. सलामीवीर बटलरला गवसलेला फॉर्म ही त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे. बटलरने याआधीच्या सामन्यात 44 चेंडूत 70 धावा फटकावल्या होत्या.
गोलंदाजीत राजस्थानचा पूर्ण भार आर्चर व टॉम करण यांच्यावरच पडला आहे. स्पिनर राहुल तेवातियाला ब्रेकथ्रू मिळविण्यात सातत्य राखता आलेले नाही. याउलट दिल्लीची गोलंदाजी भक्कम असून त्यांना फलंदाजांकडून उत्तम साथ मिळत आली आहे. कर्णधार अय्यर बहरात असून पृथ्वी शॉ, रिषभ पंत यांनी आपापले काम चोखपणे पार पाडले आहे. याशिवाय स्टोईनिसनेही दोन धडाकेबाज अर्धशतके नोंदवली आहेत. गोलंदाजीत रबाडाने आतापर्यंत 12 बळी घेतले असून तो आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाज बनला आहे. द.आफ्रिकेचा ऍन्रिच नॉर्त्जेनेही मोक्याच्या क्षणी संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे तर इशांतच्या जागी आलेल्या हर्शल पटेलने केकेआरविरुद्ध 34 धावांत 2 बळी मिळवित चांगली कामगिरी केली. पण नंतरच्या सामन्यात त्याने 43 धावा बहाल केल्या. पुनरागमन केलेल्या आर. अश्विननेही 26 धावांत 1 बळी घेत समाधानकारक कामगिरी केली आहे.
संघ : राजस्थान रॉयल्स : स्मिथ (कर्णधार), बटलर, स्टोक्स, सॅमसन, टाय, कार्तिक त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, उनादकट, मयांक मार्कंडे, महिपाल लोमरोर, ओशेन थॉमस, रियान पराग, जैस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, मिलर, मनन व्होरा, शशांक सिंग, वरुण ऍरोन, टॉम करण, उथप्पा, अनिरुद्ध जोशी, आर्चर.
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आर.अश्विन, धवन, शॉ, हेतमेयर, रबाडा, रहाणे, अमित मिश्रा, पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछाने, कीमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, ऍन्रिच नॉर्त्जे, ऍलेक्स कॅरे, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्शल पटेल, स्टोईनिस, ललित यादव.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.