‘कोरोना’ रुग्णांसदर्भात सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना
17 दिवसानंतर ‘होम क्वारंटाईन’मधून होणार मुक्तता
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
‘कोरोना’ची लक्षणे नसणाऱया किंवा सौम्य लक्षणे असणाऱया ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णाला आता घरीच विलगीकरणात ठेवता येणार आहे. तसेच 17 दिवसानंतर गृह विलगीकरणातून मुक्त केले जाणार असून पुन्हा ‘कोरोना’ नमुना तपासणी करण्याची गरज नाही, अशा नव्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ला सोबत घेऊनच यापुढे लढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांना घरी ठेवण्यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. शासनाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यासंबंधी आदेश काढले आहेत.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्षणे नसणाऱया किंवा सौम्य लक्षणे असणाऱया ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णाला घरीच विलगीकरणात ठेवता येणार आहे. मात्र, त्या ठिकाणी आवश्यक सुविधा असणे आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागणार आहेत. तसे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
नव्या सूचनांनुसार अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना जर त्यांच्या घरामध्ये योग्यप्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमती नुसार घरी विलगीकरणाचा पर्याय देण्यात यावा, असे जिल्हाधिकाऱयांना काढलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच घरी विलगीकरण केल्यावर रुग्णाने स्वत: व घरातील काळजीवाहू व्यक्तींनी आरोग्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गंभीर लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. विशेषतः धाप लागणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, छातीत सतत दुखणे, शुद्ध हरपणे, ओठ किंवा चेहरा निळसर पडणे, अशी लक्षणे आढळल्यास संदर्भ सेवा घेणे आवश्यक राहणार आहे. आरोग्य सेतू अँपद्वारे सल्ला घेणे आवश्यक असून घरातील सर्व व्यक्तींनी वेळच्या वेळी औषधे घेणे, आरोग्य सर्व्हे करणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांना आरोग्याविषयी खरी माहिती द्यावी लागणार आहे.
…तर टेस्टचीही गरज नाही!
घरीच विलगीकरणात ठेवण्यात येणाऱया ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णाला लक्षणे सुरू झाल्यानंतर किंवा विलगीकरणात ठेवल्यापासून 17 दिवसानंतर किंवा रुग्णालयात चाचणीसाठी नमुना घेतलेला असेल तेथून 17 दिवसानंतर आणि मागील 10 दिवसापासून ताप येत नसेल तर गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात यावे. त्या रुग्णाला ‘कोरोना’ टेस्टची गरजही नाही, अशाप्रकारे शासनाने ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
‘कोरोना’सोबतच जगा!
देशभरात ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात सुरू झाला आहे. रुग्णालये अपुरी पडू लागली आहेत. ‘कोरोना’ संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी आता ‘कोरोना’ला सोबत घेऊन लढावे लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता आणली आहे. त्यानंतर आता लक्षणे नसणाऱया किंवा सौम्य लक्षणे दिसणाऱया ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेत शासनाने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.