बेंगळूर/ बेळगाव
ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांच्यासह एकूण 67 जणांची कर्नाटक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी याबाबतचा आदेश दिला आहे.
पक्षाचे धोरण आणि विचारसरणी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याने तुमच्या अनुभवाचा विचार करून पक्षाचे प्रवक्ता म्हणून नेमणूक करण्यात येत आहे, असा उल्लेख डी. के. शिवकुमार यांनी आदेशपत्रकामध्ये केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या संवहन आणि प्रसारमाध्यम प्रमुखांनी दिलेल्या सल्ला, सूचनाबाबत त्वरित कार्यप्रवृत्त व्हावे, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.
नेमणुकीविषयी प्रतिक्रिया देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी डी. के. शिवकुमार यांचे आपण आभार मानत असून पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून आपण यापुढेही सेवा बजावत राहीन, जनतेच्या कल्याणासाठी शिस्त आणि संयमाने कामे करीत, अशी ग्वाही दिली. चित्रदुर्गचे माजी खासदार बी. एन. चंद्रप्पा आणि माजी शिक्षणमंत्री किम्मने रत्नाकर यांची देखील प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे.