प्रतिनिधी / बेळगाव
बी. एम. कंकणवाडी महाविद्यालयात रुग्ण आणि विद्यार्थी यांना आयुर्वेदाचा अधिकाधिक लाभ व्हावा, या हेतूने ‘लक्ष्य व्हिजन 2040’ हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी ते म्हणाले, केएलई आयुर्वेदाचे महत्त्व पुन्हा वाढत आहे. रुग्णांना आयुर्वेदामुळे लाभ होत आहे. जागतिक स्तरावर आयुर्वेदाला मान्यता मिळाली असून केएलई आयुर्वेद महाविद्यालयाने नेहमीच आयुर्वेदाचा पुरस्कार केला आहे. ‘लक्ष्य’ हा उपक्रम स्तुत्य असून त्याचे नियोजन व अंमलबजावणी महत्त्वाची आहे.
प्राचार्य डॉ. बी. एस. प्रसाद यांनी कॉलेजचा लोगो, व्हिजनची उद्दिष्टे याबाबत माहिती दिली. लोगोचे अनावरण काहेर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी यांनी केले. यावेळी लक्ष्य उपक्रमातील सदस्य डॉ. अजिज, डॉ. राजेश्वरी कामत, विनायक इंचल, डॉ. आदर्श यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रसन्ना सावनूर, डॉ. प्रशांत जाडर उपस्थित होते.