ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप : मलेशियाच्या विद्यमान विजेत्या जियाला नमवले
वृत्तसंस्था / बर्मिंगहम
वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक जेता लक्ष्य सेनने मलेशियन विद्यमान विजेत्या ली जी जियावर रोमांचक विजय संपादन करत ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली! अवघ्या 20 वर्षांचा लक्ष्य सेन या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा केवळ चौथा भारतीय पुरुष खेळाडू ठरला. यापूर्वी, पुरुष गटात प्रकाश नाथ, प्रकाश पदुकोण व पुलेला गोपीचंद या तिघाच भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारता आली आहे.
लक्ष्य सेनने सहाव्या मानांकित ली याला 21-13, 12-21, 21-19 अशा फरकाने मात दिली. ही लढत 1 तास 16 मिनिटात निकाली झाली. भारतातर्फे आजवर ही स्पर्धा जिंकणे केवळ दोघाच खेळाडूंना शक्य झाले असून यात पदुकोण (1980) व गोपीचंद (2001) यांचा समावेश आहे. यापूर्वी, प्रकाश नाथ (1947) व महिला एकेरी खेळाडू सायना नेहवाल (2015) यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावे लागले आहे.
आज (रविवार दि. 20) होणाऱया अंतिम लढतीत लक्ष्य सेनचा मुकाबला अव्वलमानांकित, विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर ऍक्झेल्सन-चोऊ तिएन चेन यांच्यातील विजेत्याशी होईल.
लक्ष्य सेन मागील सहा महिन्यांपासून बहारदार फॉर्ममध्ये असून डिसेंबर महिन्यात त्याने पदार्पणाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर जानेवारीत इंडिया ओपन स्पर्धेत पहिले सुपर 500 टायटल जिंकण्यात तो यशस्वी ठरला. गत आठवडय़ात जर्मन ओपनमध्ये तो उपविजेता ठरला. 6 वर्षांपूर्वी ली विरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय लढतीत देखील लक्ष्य सेनने विजय संपादन केला होता.