जर्मन ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा
वृत्तसंस्था/ मुलहीम ऍन डेर रुहर
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या भारताच्या लक्ष्य सेनने जर्मन ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला, पण त्याचा सहकारी किदाम्बी श्रीकांतचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
गेल्या जानेवारीत लक्ष्य सेनने इंडिया ओपन सुपर 500 स्पर्धेचे पहिल्यांदाच जेतेपद पटकावले होते. त्याने हा फॉर्म कायम राखत आपल्याच देशाच्या एचएस प्रणॉयचा 21-15, 21-18 असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. 39 मिनिटे हा सामना चालला होता. जागतिक क्रमवारीत सध्या 14 व्या स्थानावर असणाऱया सेनने इंडिया ओपन स्पर्धेतही प्रणॉयला उपांत्यपूर्व फेरीत हरविले होते. याआधी दुसऱया फेरीत त्याने चौथ्या मानांकित इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिनटिंगला 21-7, 21-9 असा पराभवाचा धक्का दिला होता. त्याची उपांत्य लढत अग्रमानांकित व ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनशी होणार आहे.
जागतिक अग्रमानांकित ऍक्सेलसेनने भारताच्या के. श्रीकांतचे आव्हान 21-10, 23-21 असे संपुष्टात आणले. श्रीकांतचा हा त्याच्याकडून झालेला सलग सहावा पराभव आहे. त्याआधी त्याने तीनवेळा ऍक्सेलसेनला हरविले होते. 2017 डेन्मार्क ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविताना श्रीकांतने त्याला नमविले होते. कोव्हिडमधून बरा झाल्यानंतर श्रीकांतची ही पहिलीच स्पर्धा होती. ऍक्सेलसेनविरुद्ध तो प्रारंभी निष्प्रभ ठरल्यामुळे ऍक्सेलसेनने 17-4 अशी बढत घेतली. नंतर हा गेम ऍक्सेलसेनने जिंकून आघाडी घेतली. पण दुसऱया गेममध्ये श्रीकांतने जोरदार लढत दिली असली तरी अखेर ऍक्सेलसेननेच बाजी मारत आगेकूच केली.