वृत्तसंस्था/ ओडेन्स, डेन्मार्क
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये यशस्वी पुनरागमन करताना डेन्मार्क ओपन स्पर्धेत ख्रिस्तो पोपोव्हचा पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे. या स्पर्धेने बॅडमिंटनने सात महिन्यांच्या कोरोना बेकनंतर आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले आहे.
19 वर्षीय लक्ष्य सेनने गेल्या वर्षी पाच अजिंक्यपदे मिळविली असून त्यात दोन सुपर 100 स्पर्धांचा समावेश आहे. येथील सामन्यात त्याने सफाईदार खेळ करीत पोपोव्हचा 21-9, 21-15 असा पराभव केला. त्याची लढत डेन्मार्कचा हॅन्स क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगहस व बेल्जियमचा मॅक्झिम मॉरील्स यांच्यातील विजयी खेळाडूशी होईल. ‘माझ्या हालचाली व्यवस्थित होत होत्या आणि हाच महत्त्वाचा घटक होता. दुसऱया गेममध्ये माझ्याकडून काही चुका झाल्याने पोपोव्हला आघाडी मिळाली होती. पण या चुका कमी करून लय मिळविली आणि गेमसह सामनाही जिंकला,’ असे लक्ष्य सेनने म्हटल्याचे बीएआयने सांगितले.
तो सध्या जागतिक क्रमवारीत 27 व्या स्थानावर आहे. पहिल्यापासूनच तो चांगल्या टचमध्ये असल्याचे दिसून आले आणि ब्रेकवेळी त्याने 11-8 अशी आघाडी घेतली होती. त्याने नंतरही पोपोव्हला अजिबात संधी न देता सलग तीन गुण घेत 14-8 अशी बढत वाढविली. नंतरचे सात गुणही त्याने सलग जिंकत हा गेम जिंकला. दुसऱया गेममध्ये मात्र दोघांत जोरदार चुरस पहावयास मिळाली. तोडीस तोड खेळ करीत दोघांची 12-12 अशी बरोबरी झाली असताना लक्ष्यने ब्रेक मिळवित 15-12 आणि नंतर 16-14 अशी आघाडी घेत नंतर गेमसह सामना संपवला.
डेन्मार्क ओपन ही या वर्षात होणारी एकमेव सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा असून बीडब्ल्यूएफने काही स्पर्धा रद्द केल्या तर आशियाई टप्पा आणि वर्ल्ड टूर फायनल पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकले आहेत.