ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप : प्रणॉयचे आव्हान समाप्त, दुखापतीमुळे सायनाची माघार
वृत्तसंस्था / बर्मिंगहम
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली तर एचएस प्रणॉयचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त झाले. सायना नेहवालला पहिल्या फेरीच्या लढतीतील दुसऱया गेमवेळी पायाला दुखापत झाल्याने तिने माघार घेतली.
2019 मध्ये पाच स्पर्धा जिंकलेल्या 19 वर्षीय लक्ष्य सेनने फ्रान्सच्या थॉमस रूझेलचा 21-18, 21-17 असा पराभव करून आगेकूच केली. आशियाई कनिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद, वर्ल्ड कनिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि 2018 मधील युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्य जिंकलेल्या लक्ष्यची पुढील लढत आयर्लंडचा एन्हात एन्ग्युएन किंवा नेदरलँड्सचा मार्क कॅलो यापैकी एकाशी होईल. एचएस प्रणॉयला मात्र अग्रमानांकित केन्टो मोमोटाकडून हार पत्करावी लागली. मोमोटाने त्याला 48 मिनिटांच्या खेळात 21-15, 21-14 असे हरवित आगेकूच केली. प्रणॉयप्रमाणे मिश्र दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रनकिरेड्डी व अश्विनी पोनप्पा यांचे आव्हानही संपुष्टात आले. या जोडीला जपानच्या युकी कानेको व मिसाकी मात्सुमोटो यांच्याकडून पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
सायनाची दुखापतीमुळे माघार
बुधवारी रात्री प्रणॉय, लक्ष्य सेन, बी. साई प्रणीत, समीर वर्मा यांनी पहिली फेरी जिंकून दुसरी फेरी गाठली होती. पण माजी जागतिक अग्रमानांकित सायना नेहवालला दुखापतीमुळे पहिल्या फेरीतून माघार घ्यावी लागली. डेन्मार्कच्या सातव्या मानांकित मिया ब्लिचफेल्टविरुद्ध तिचा सामना सुरू असताना पहिला गेम 8-21 असा गमविल्यानंतर दुसऱया गेममध्ये ती 4-10 असे पिछाडीवर असताना उजव्या मांडीत वेदना होऊ लागल्याने तिने सामना सोडण्याचा निर्णय घेतला.
जागतिक 15 वा मानांकित प्रणीतने फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हचा तर प्रणॉयने मलेशियाच्या डॅरेन ल्यूचा आणि समीर वर्माने ब्राझीलच्या वायगोर कोएल्होचा पराभव करून दुसरी फेरी गाठली होती. लक्ष्य सेनने मात्र जागतिक 18 व्या मानांकित कान्ताफोन वांगचारोनला 21-18, 21-12 असा पराभवाचा धक्का दिला होता. मिश्र दुहेरीत प्रणाव जेरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांना पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या रासमुस ईस्पर्सेन व ख्रिस्तिन बुश यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरी फेरी गाठलेल्या पीव्ही सिंधूची लढत डेन्मार्कच्या लाईन ख्रिस्तोफर्सनशी होणार आहे.