एचएस प्रणॉय व दुहेरीच्या दोन जोडय़ा पराभूत
वृत्तसंस्था/ सुन्चेऑन
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या भारताचा लक्ष्य सेन व मालविका बनसोड यांनी येथे सुरू झालेल्या कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. एचएस प्रणॉयला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला तर पुरुष दुहेरीतही भारताच्या दोन जोडय़ांना पराभूत व्हावे लागले.
लक्ष्य सेनने कोरियाच्या चोई जि हून याचे कडवे आव्हान 14-21, 21-16, 21-18 असे परतावून लावले. मालविकानेही संघर्षपूर्ण लढतीत चीनच्या जागतिक 24 व्या मानांकित हान युइवर 20-22, 22-20, 21-10 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. सहावा मानांकित सेन गेल्या सहा महिन्यापासून बहरात असून लागोपाठ झालेल्या जर्मन ओपन व ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत त्याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याची पुढील लढत इंडोनेशियाच्या शेसर हिरेन ऱहुस्ताव्हिटोशी होईल. गेल्या जानेवारीत सईद मोदी सुपर 300 स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या मालविकाची पुढील लढत थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवाँगविरुद्ध होणार आहे.
स्विस ओपनची अंतिम फेरी गाठलेल्या एचएस प्रणॉयचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याला मलेशियाच्या चिआम जुन वेईने 21-17, 21-7 असे केवळ 41 मिनिटांत हरविले. दुहेरीत पुरुष विभागात कृष्णा प्रसाद गरग व विष्णुवर्धन गौड पंजाला यांना इंडोनेशियाच्या प्रमुद्या कुसुमावर्धना व येरेमिया एरिच योचे याकूब रामबितन या जोडीकडून 14-21, 19-21 असा पराभव स्वीकारावा लागला. तसेच बी. नवनीत व बी. सुमीत रेड्डी यांनाही सहावी मानांकित मलेशियन जोडी आँग यू सिन व तेव एइ यी यांच्याकडून 14-21, 19-21 असाच पराभव पत्करावा लागला.
चोईविरुद्ध खेळताना सेनला प्रारंभी जड गेले. पहिल्या गेममध्ये चोइनेच बऱयापैकी वर्चस्व गाजवले. पण 14-14 वर सेनने त्याला गाठले असले तरी सलग सात गुण मिळवित चोइने पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱया गेममध्ये मात्र सेनने उंचावणारा खेळ केला आणि मध्यंतरापर्यंत 11-7 अशी आघाडी घेतली. बेकनंतरही त्याने हाच जोम कायम ठेवत हा गेम जिंकून सेनने बरोबरी साधली. तिसऱया व निर्णायक गेममध्ये चोइने सुरुवातीला 8-3 अशी बढत घेत विजयाच्या दिशेने आगेकूच केली होती. पण सेनने नंतर 16-13 अशी बढत घेत त्याचे मनसुबे उधळून लावले. अखेरच्या टप्प्यात आघाडी कायम ठेवत सेनने गेमसह सामना जिंकून आगेकूच केली.
मालविकानेही हान युइविरुद्ध पहिल्या गेममध्ये बऱयाचदा आघाडी घेतली होती. तिने चार गेमपॉईंटही मिळविले होते. पण तिला त्याचा लाभ घेता आला नाही आणि हान युइने हा गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱया गेममध्ये मालविकाने पुन्हा वर्चस्व राखत 11-4 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतरही तिने आघाडी कायम ठेवत तीन गेमपॉईंटही मिळविले. पण हान युइने तिला गाठले तरी मालविकाने हा चुरशीचा गेम जिंकून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये मालविकाने जागरूकता दाखवित 7-7 वर हान युइला भेदले आणि त्यानंतर सलग 9 गुण घेत तिने गेमसह सामना जिंकून पुढील फेरी गाठली.