ऑनलाईन टीम / लखनऊ :
लखनऊचे पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांना फोनकरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाने पोलीस खात्यात खळबळ उडाली असून, आयुक्तांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवून हे प्रकरण डीसीपी दक्षिणकडे सोपविण्यात आले आहे.
आज सकाळी पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमांकर अज्ञाताचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने फोनवरून पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुख्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. सर्व्हेलन्स सेलला या फोनचे लोकेशन दिल्ली असल्याचे समजले. पोलिसांचे पथक यासंदर्भात अधिक तपास करत आहे.
या प्रकरणात शासनाने कारवाईचे निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली असून, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.