आयपीएल साखळी सामन्यात 6 गडी राखून एकतर्फी मात, क्विन्टॉन डी कॉकचा 52 चेंडूत 80 धावांचा झंझावात, युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईचे 22 धावात 2 बळी
वृत्तसंस्था /नवी मुंबई
लेगस्पिनर रवी बिश्नोईचे 2 बळी आणि क्विन्टॉन डी कॉकच्या 52 चेंडूतील 80 धावांच्या झंझावाती खेळीच्या बळावर लखनौ सुपरजायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल साखळी सामन्यात पराभवाचा हाय व्होल्टेज धक्का दिला. प्रारंभी, दिल्लीने पृथ्वी शॉच्या 34 चेंडूतील 61 धावांच्या खेळीमुळे निर्धारित 20 षटकात 3 बाद 149 धावा केल्या तर प्रत्युत्तरात लखनौने 19.4 षटकात 4 बाद 155 धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान असताना लखनौतर्फे केएल राहुल (24) व डी कॉक (80) यांनी 9.4 षटकात 73 धावांची सलामी दिली. मधल्या फळीत इव्हिन लुईस (5) व दीपक हुडा (11) स्वस्तात बाद झाले. पण, कृणाल पंडय़ा (नाबाद 19) व आयुष बदोनी (नाबाद 10) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. बदोनीने शार्दुलला एक्स्ट्रा कव्हरवरुन षटकारासाठी पिटाळून लावत विजय मिळवून दिला.
पृथ्वी शॉचे अर्धशतक
प्रारंभी, पृथ्वी शॉच्या धमाकेदार अर्धशतकानंतर देखील दिल्ली कॅपिटल्सला दीडशेहे धावांचा टप्पाही सर करता आला नाही. शॉ क्रीझवर असताना दिल्लीचे सामन्यावर उत्तम वर्चस्व होते. पण, तो आठव्या षटकात बाद झाला आणि लखनौ सुपरजायंट्सच्या गोलंदाजांनी सामन्याला कलाटणी देण्यास सुरुवात केली. युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईने (2-22) लखनौकडून लक्षवेधी कामगिरी नोंदवली.
डावखुरा डेव्हिड वॉर्नर (12 चेंडूत 4) या हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात बाद होईतोवर झगडत राहिला. वॉर्नरने याच संघातर्फे 2009 मध्ये आयपीएल पदार्पण नोंदवले आहे.
शॉ लखनौच्या गोलंदाजांवर बरसत असताना वॉर्नरला मात्र त्या तुलनेत सहज फटकेबाजी अजिबात करता आली नाही. ऑफस्पिनर के. गौतमला (1-23) डावातील दुसरे षटक सोपवले गेले आणि शॉने कव्हर्समधून खणखणीत चौकार खेचत त्याचे जोरदार स्वागत केले. शॉने नंतर जेसॉन होल्डरला देखील मिडविकेटवरुन षटकारासाठी पिटाळून लावले. त्यानंतर चौथ्या षटकात अवेश खानच्या गोलंदाजीवर हॅट्ट्रिक चौकार वसूल केले गेले.
एकीकडे, शॉ सहजपणे तुटून पडत असताना वॉर्नरची फलंदाजी मात्र एखाद्या दुसऱया खेळपट्टीवर सामना सुरु असावा, अशी होत होती. शॉने कट व पूलचे नजाकतदार फटके लगावत धावांचा ओघ कायम ठेवला आणि याच बळावर दिल्लीने पॉवर प्लेच्या 6 षटकात बिनबाद 52 अशी आक्रमक सुरुवात केली.
पॉवर प्लेनंतर मात्र लखनौने शॉ, वॉर्नर व रोव्हमन पॉवेल (10 चेंडूत 3) यांचे अवघ्या 18 चेंडूत बळी घेत सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. शॉने गौतमला षटकार खेचल्यानंतर यष्टीमागे सोपा झेल दिला तर वॉर्नर बिश्नोईच्या गोलंदाजीवर खराब फटका मारत आपली विकेट बहाल करुन गेला. पॉवेल देखील बिश्नोईचे सावज ठरला. बिश्नोईच्या गुगलीवर स्लॉग-स्वीपचा फटका सपशेल फसल्यानंतर पॉवेलला त्रिफळाचीत होत परतावे लागले.
आघाडीवीर तंबूत परतल्यानंतर संघाला मोठी धावसंख्या प्राप्त करुन देण्याची जबाबदारी कर्णधार रिषभ पंतवर (36 चेंडूत 39) होती आणि ती त्याने सर्फराज खानसह (28 चेंडूत नाबाद 36) पार पाडण्याचा प्रयत्न केला. सर्फराज येथे दिल्ली प्रँचायझीतर्फे पहिलाच सामना खेळत होता.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : 20 षटकात 3 बाद 149 (पृथ्वी शॉ 34 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह 61, रिषभ पंत 36 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 39, सर्फराज खान 28 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 36. अवांतर 6. रवी बिश्नोई 4 षटकात 2-22, कृष्णप्पा गौतम 4 षटकात 1-23).
लखनौ सुपरजायंट्स : 19.4 षटकात 4 बाद 155 (क्विन्टॉन डी कॉक 52 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह 80, केएल राहुल 25 चेंडूत 24, कृणाल पंडय़ा 14 चेंडूत नाबाद 19, आयुष बदोनी 3 चेंडूत नाबाद 10. कुलदीप 2-31, शार्दुल, ललित प्रत्येकी 1 बळी).