आयपीएल साखळी सामना : शेवटच्या षटकात रोमांचक मात, इव्हिन लुईस-बदोनीची निर्णायक फटकेबाजी, चेन्नई सुपरकिंग्सचा सलग दुसरा पराभव
मुंबई / वृत्तसंस्था
इव्हिन लुईस (23 चेंडूत नाबाद 55) व आयुष बदोनी (9 चेंडूत नाबाद 19) यांच्या चौफेर फटकेबाजीच्या बळावर लखनौ सुपरजायंट्सने आयपीएल साखळी सामन्यात बलाढय़ चेन्नई सुपरकिंग्सला 6 गडी राखून धूळ चारली. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या या लढतीत चेन्नईने 7 बाद 210 धावांचा डोंगर रचल्यानंतर लखनौने 19.3 षटकात 4 बाद 211 धावांसह लक्षवेधी विजय संपादन केला. आयपीएल इतिहासातील हा धावांचा सर्वोच्च चौथा यशस्वी पाठलाग ठरला.
प्रारंभी, रॉबिन उत्थप्पाने चौफेर फटकेबाजी करत शानदार अर्धशतक साजरे केल्यानंतर चेन्नईने 7 बाद 210 धावांची जोरदार मजल मारली. उत्थप्पाने 27 चेंडूत 50 तर शिवम दुबेने 30 चेंडूत 49 धावांची आतषबाजी केली. कर्णधार रविंद्र जडेजा (9 चेंडूत 17) व महेंद्रसिंग धोनी (6 चेंडूत 16) यांनीही शेवटच्या षटकात जोरदार हाणामारी करत संघाला द्विशतकी टप्पा सर करुन दिला.
युवा लेगस्पिनर रवि बिश्नोईने (2-24) काटेकोर मारा साकारत चेन्नईच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्या तुलनेत लखनौच्या अन्य गोलंदाजांनी मात्र बरीच निराशा केली. ऍन्डय़्रू टायला (2-41) आपल्या शेवटच्या षटकात 2 गडी बाद करता आले.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर उत्थप्पाने अवेश खानला (2-38) लागोपाठ चौकार फटकावत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. शिवाय, संधी मिळाल्यानंतर दणकेबाज षटकारही खेचला. नंतर बिश्नोईने बॅकवर्ड पॉईंटवरुन थेट थ्रो करत ऋतुराज गायकवाडला धावचीत केले, त्यावेळी चेन्नईला धक्का बसला. तो बाद झाल्यानंतर उत्थप्पाने मोईन अलीसह जोरदार फटकेबाजी करत धावसंख्येला गती दिली. सुपरजायंट्सच्या गोलंदाजांसमोर यापुढे काहीच पर्याय बाकी नव्हता आणि चेन्नईने पॉवर प्लेअखेर 1 बाद 73 अशी मोठी धावसंख्या रचली होती.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स : 20 षटकात 7 बाद 210 (रॉबिन उत्थप्पा 27 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 50, शिवम दुबे 30 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 49, मोईन अली 22 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 35, अम्बाती रायुडू 20 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 27, रविंद्र जडेजा 17, महेंद्रसिंग धोनी 6 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 16. अवांतर 14. अवेश खान, ऍन्डय़्रू टाय, रवी बिश्नोई प्रत्येकी 2 बळी).
लखनौ सुपरजायंट्स : 19.3 षटकात 4 बाद 211 (केएल राहुल 40, डी कॉक 61, इव्हिन लुईस नाबाद 55, आयुष बदोनी नाबाद 19. प्रिटोरियस 2-31, ब्रेव्हो, तुषार प्रत्येकी 1 बळी).
सामन्याचा टर्निंग पॉईंट…..शिवम दुबेच्या 19 व्या षटकात 25 धावा!
शेवटच्या 2 षटकात 34 धावांची आवश्यकता असताना चेन्नईने शिवम दुबेकडे गोलंदाजी सोपवली आणि बदोनी-लुईस जोडीने या 6 चेंडूत चक्क 25 धावांची आतषबाजी करत या सामन्याचा नूरच बदलून टाकला. बदोनीने पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगकडे उत्तुंग षटकार खेचल्यानंतर 2 वाईड चेंडूनंतर एकेरी धाव घेतली. त्यानंतर लुईसने दुहेरी धावा घेतल्या आणि शेवटच्या 3 चेंडूत कव्हर्स व लाँगऑफच्या दिशेने 2 चौकार व 1 षटकार वसूल करत जोरदार फटकेबाजीचा अस्सल नमुना पेश केला.
चेन्नईचा शेवटच्या षटकातील डावही फसला!
शेवटच्या षटकात 9 धावांची आवश्यकता असताना चेन्नईने नवख्या मुकेश चौधरीकडे गोलंदाजी सोपवली. मात्र, ही चाल त्यांच्यावरच उलटल्याचे पहिल्या तीन चेंडूमध्येच स्पष्ट झाले. प्रारंभी, मुकेशने सलग 2 वाईड टाकले आणि बदोनीने बॅकवर्ड स्क्वेअरकडे उत्तुंग षटकार खेचला. इथे लखनौने बरोबरी साधली. त्यानंतर बदोनीने मिडविकेटकडे एकेरी धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.