लखनौ :
उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी आयपीएस एस.आर. दारापुरी, कथित सामाजिक कार्यकर्ते सदफ जफर समवेत 13 आरोपींना जामीन मिळाला आहे. सत्र न्यायालयाने 13 जणांना शनिवारी जामीन मंजूर केला आहे.
दारापुरी पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यावर कथित मानवाधिकार कार्यकर्त्याच्या स्वरुपात काम करत आहेत. 2014 मधील लोकसभा निवडणूक लढविलेल्या दारापुरी यांना हिंसक निदर्शनांचा कट रचणे तसेच जमावाला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
सदफ, दारापुरी आणि अन्य आरोपींच्या जामीन याचिकेवर न्यायालयाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला होता. लखनौ शहरात झालेल्या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई आरोपींकडून केली जाणार आहे. यानुसार प्रशासनाने आरोपींना नोटीसही बजावली आहे.