वृत्तसंस्था/ नवी मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथे लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होत आहे. या सामन्यात लखनौ संघाला विजयासाठी आपली फलंदाजी भक्कम करावी लागेल.
लखनौ संघाचे नेतृत्व के.एल. राहुल करत असून सनरायजर्स हैदराबादचे कर्णधारपद केन विल्यम्सनकडे सोपविण्यात आले आहे. आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या लखनौ संघाच्या मोहिमेला चांगला प्रारंभ झाला नाही. पहिल्या सामन्यात लखनौ संघाला या स्पर्धेत पहिल्यांदाच पदार्पण करणाऱया गुजरात टायटन्सकडून पाच गडय़ांनी हार पत्करावी लागली पण दुसऱया सामन्यात लखनौ संघाने विद्यमान विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडय़ांनी पराभव करून विजयाचे खाते उघडले. या सामन्यात कर्णधार के.एल.राहुल आणि डिकॉक यांची फलंदाजी उपयुक्त ठरली. राहुल आणि डिकॉक या जोडीने सलामीच्या गडय़ासाठी 99 धावांची भागिदारी केली होती. त्यामध्ये राहुलचा वाटा 40 होता. डिकॉकने 61 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा फलंदाज लेवीसने 23 चेंडूत चौकार आणि षटकारांची बरसात करत नाबाद 55 धावा झोडपल्या. आयुष बदोणी आणि दीपक हुडा यांनी मध्यफळीत उपयुक्त खेळी केली. मात्र मनिष पांडे सुर मिळविण्यासाठी झगडत आहे. कृणाल पंडय़ा आणि विंडीजचा जेसन होल्डर यांना समाधानकारक कामगिरी करता आली नाही. लखनौ संघाच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने अवेश खान, लंकेचा चमिरा, अँड्रूय़ू टाय आणि बिश्नोई यांच्यावर राहील.
सनरायजर्स संघाला आपल्या फलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल. कर्णधार विल्यम्सन, राहुल त्रिपाठी, पुरन, अब्दुल समद, अभिषेक शर्मा हे हैदराबाद संघातील प्रमुख फलंदाज आहेत. या संघातील दक्षिण आफ्रिकेच्या मॅरक्रमने पहिल्या सामन्यात 41 चेंडूत नाबाद 57 तर सुंदरने 14 चेंडूत 40 धावा झोडपल्या होत्या. भुवनेश्वरकुमार, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि उमरान मलिक हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. सनरायजर्स हैदराबाद संघाला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून हार पत्करावी लागल्याने आता हैदराबाद संघ सोमवारच्या सामन्यात आपल्या विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न करेल.