प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात कामाधंद्यासाठी येवून महिला व युवतींना परप्रांतियांकडून फशी पाडण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहे. उगाच अब्रूचे धिंडवडे नको म्हणून काही तक्रार दाखलही होत नाहीत. अशीच एक घटना घडली असून एका विवाहित महिलेला फशी पाडून तिच्यावर अत्याचार करणाऱया व तिचे सोने, दुचाकी, मोबाईल घेवून फसवणूक करणाऱया परप्रांतियास सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा शहर परिसरातील एका उपनगरातील एका 33 वर्षीय महिलेचा विश्वास संपादन करुन तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर एकाने अत्याचार व फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या युवकाचे नाव मुकेश उर्फ राज विश्वकर्मा (रा. गिरीडीह, झारखंड) असे आशहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून 2019 ते 18 जानेवारी 2020 या कालावधीत ही घटना घडली आहे. सातारा शहर परिसरात उपनगरात कामाच्या निमित्ताने आलेल्या व भाडय़ाने रहात असलेल्या मुकेश उर्फ राज विश्वकर्मा याने एका 33 वर्षीय महिलेला तिच्या घरातील असलेल्या परिस्थितीचा फायदा घेत तिचा विश्वास संपादन करुन तिचे सोने, दुचाकी, मोबाईल घेवून तिची फसवणूक केली. तसेच तिला लग्नाचे अमिष दाखवत त्याने तिच्या इच्छेविरोधात अत्याचार केला आहे.
याबाबतची तक्रार पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी मुकेश उर्फ राज विश्वकर्मा याला अटक केले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे करीत आहेत.