वाढत्या वजनाबाबत अनेक जण निश्चिंत असतात. पण मंडळी लठ्ठपणा हा केवळ आपल्याला स्थूल बनवत नाही तर अनेक आजारांशी, समस्यांशी आपले नाते जोडून जातो. त्यांविषयी…
- टाइप-टू डायबिटिजः मधुमेहाचा हा प्रकार लठ्ठ मुलांत अधिक दिसून येतो. स्थूल मुलांच्या शारिरीक रचनेमुळे उपलब्ध ग्लुकोजचा पूर्णपणे वापर होत नाही. वेळीच उपाय न केल्यास डोळे, मूत्रपिंड या विकाराबरोबरच अन्य आजार उदभवण्याचा धोका राहतो.
- श्वासाची समस्या :अमेरिकेत एकूण अस्थमा पीडितांपैकी सुमारे 38 टक्के मुले लठ्ठपणाने त्रस्त आहेत. चरबी वाढल्याने श्वसननलिका आकुंचित होतात.
- घोरणे : सरासरीपेक्षा अधिक वजनाच्या मुलांच्या मानेवर चोहोबाजूंनी अतिरिक्त चरबी जमा झालेली असते. यांमुळे मान मोठी होते. अशावेळी झोपताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी सतत
झोपमोड होते. घोरण्याचा त्रास देखील वाढतो. - उच्च रक्तदाब : असंतुलित आहारामुळे कॉलेस्ट्रॉल वाढू लागते. त्याचा परिणाम रक्तपेशींवर होतो. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास बळावू शकतो. दीर्घकाळापर्यंत अशीच स्थिती राहिली तर रक्तवाहिन्या आकुंचित होतात आणि भविष्यात हृदयाविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते.
- सांधेदुखी : सरासरीपेक्षा अधिक वजन हे सांध्याला हानीकारक आहे. लहान वयातच गुडघेदुखी, टाचदुखी, पिंडर्या दुखणे, कंबरदुखी या सारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. अशावेळी तोल जावून एखादा मुलगा जमीनीवर पडला तर त्याला फ्रक्चर होऊ शकते.
- फॅटी लिव्हर : या आजारात कोणत्याही प्रकारचे बाह्य लक्षणे दिसत नाहीत. मात्र हळूहळू लिव्हरवर फॅट जमा होऊ लागते. त्यामुळे लिव्हर खराब होण्याचा धोका असतो आणि तब्येतीच्या कुरबुरी सुरू होऊ शकतात.
- लठ्ठपणा हा मुलांच्या मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम करतो.नातेवाईकांकडूनही टोमणे मारले जातात. आवडीप्रमाणे कपडे घालता येत नाहीत. तसेच मैदानी खेळ खेळण्यास अडचणी येतात. परिणामी मुलांत मानसिक नैराश्य बळावण्यास हातभार लागतो.
– डॉ. प्राजक्ता पाटील