लक्षद्वीपसाठी नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपने केंद्रशासित प्रदेश लडाख आणि लक्षद्वीपकरता रविवारी नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. लडाखमध्ये फुनचोक स्टेंजिन यांना तर लक्षद्वीपमध्ये के.एन. कसमिकोया यांना पक्षाची धुरा सोपविण्यात आली आहे.
भाजप महासचिव अरुण सिंह यांच्याकडून प्रसारित एका पत्रकात संघटन स्तरावर झालेल्या या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी लडाख आणि लक्षद्वीपमधील नव्या नियुक्त्यांना हिरवा झेंडा दाखविला आहे आणि या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे अरुण सिंह यांनी सांगितले आहे.
लडाखमध्ये स्टेंजिन हे खासदार जाम्यांग नामग्याल यांची जागा घेणार आहेत. नामग्याल हे कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयावरील संसदेतील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणामुळे ते देशभरात चर्चेत आले होते. नामग्याल तसेच भाजपचे राष्ट्रीय संघटन महासचिव बी.एल. संतोष यांनी स्टेंजिन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर कसमिकोया लक्षद्वीपमध्ये अब्दुल खादर काजी हाजी यांची जागा घेणार आहेत.