प्रतिनिधी/ कराड
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांना देशभरात श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. लतादिदी अनंतात विलीन झाल्यानंतर येथील प्रा. सतीश उपळावीकर व त्यांचे चिरंजीव ऋषिकेश उपळावीकर यांनी तीन तासात लतादिदींचे 100 स्क्वेअर फूट आकारातील ऍक्रॅलिक स्केच बनवले आहे. लतादिदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना प्रा. उपळावीकर यांनी आपल्या घराच्या टेरेसवर हे स्केच बनवले. त्यासाठी तीन तास लागले. लताजी स्वर गात (स्वर्गात) आहे… या थिमनुसार हे चित्र त्यांनी रेखाटले. त्यांना ऋषिकेश उपळावीकर याचीही मदत झाली. 10 फूट बाय 10 फूट आकारात हे चित्र त्यांनी ब्रशच्या माध्यमातून साकारले. प्रा. उपळावीकर हे कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात बी. व्होक. ग्राफिक डिझाईन विभागात साहाय्यक अधिव्याख्याता आहेत. हे चित्र मंगेशकर कुटुंबीयांना भेट देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.