प्रतिनिधी/ सातारा
म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेल्या लमाण वस्तीवरील गंगाराम रमेश राठोड (वय 12) या मुलाचा खून किरकोळ कारणातून झाल्याचे तपासात समोर येत आहे. या खूनप्रकरणी 16 वर्षीय विधीसंघर्ष युवकास पोलिसांनी ताब्यात घेतलेत असून त्याच्याकडे चौकशी सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.
लमाण वस्तीतील गंगाराम राठोड हा मुलगा दि. 5 रोजी बेपत्ता झाला असल्याची व त्याला कोणीतरी पळवून नेले असल्याची तक्रार त्याच्या आईने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. एका छोटय़ा मुलास पळवून नेल्याचा प्रकार गंभीर असल्याने याबाबत एसपी बंसल यांनी याबाबत तपास करण्याच्या सूचना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव, तालुका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचाऱयांनी तपास सुरु केल्यावर दि. 6 रोजी त्यासाठी डॉग स्कॉडचा वापर तपासात करण्यात आला. लमाण वस्तीवरील गंगाराम राठोड याच्या घराजवळ त्याच्या चपलांचा वास स्कॉडमधील डॉगला देण्यात आला. त्याने वस्तीपासून जवळच असलेल्या पिराचा माळ नावाच्या ऊसाच्या शेतापर्यंत माग काढला. त्यानंतर तिथे शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना तिथे गंगारामचा मृतदेह आढळून आला.
ही बाब तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना सांगितल्यानंतर एस. पी. अजयकुमार बंसल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट दिली. तोपर्यंत लमाण वस्तीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तिथे मोठया प्रमाणावर बंदोबस्त तैनात करावा लागला. रात्री 3 वाजेपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी एका 16 वर्षीय विधीसंघर्ष मुलाला ताब्यात घेतले असून त्यानेच गंगारामचा दगड डोक्यात मारुन किरकोळ भांडणाच्या कारणातून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.
चौकट
मृत गंगारामवर मूळ गावी अंत्यसंस्कार
लमाण वस्ती ही शासकीय जागेत वसलेली वस्ती आहे. तिथे कामाच्या निमित्ताने साताऱयात आलेल्या गवंडी, मजूरांचा भरणा आहे. तिथे विविध ठिकाणहून आलेली लोक रहात असली तरी किरकोळ भांडणे वगळता असा गंभीर प्रकार तिथे कधीही घडला नव्हता. गंगारामसारख्या बालकाच्या खुनाने वस्ती हादरुन गेली. त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश सर्वांचे हृदय पिळवटून टाकत होता. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्य घेवून नातेवाईक त्याच्या मूळ गावी अकलकोटला रवाना झाले होते. तिकडेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डोक्यात दगड घालून गंगारामला मारले
त्याच वस्तीत गंगाराम व त्याचा खून करणारा मित्र अल्पवयीन युवक राहतो. त्यांच्यात शिव्या देण्याच्या कारणातून वाद झाला होता. दि. 5 रोजी ते दोघेही एकत्र होते. गंगारामने शिवीगाळ केल्याचा राग विधीसंघर्ष आरोपी असलेल्या युवकाच्या मनात होता. घटनेदिवशी दोघे एकत्रच होते. त्याने ऊसाच्या शेतात नेवून गंगाराम याच्या डोक्यात दगड घातला. यात गंगाराम गंभीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अल्पवयीन युवकाकडे पोलीस चौकशी करत असून लमाण वस्तीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून बंदोबस्त तैनात असल्याची माहिती एस. पी. अजयकुमार बंसल यांनी दिली.