कोरोनाबाधित झाल्याने लंडनमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर उपचार
लंडन / वृत्तसंस्था
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी लंडनमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. दोन आठवडय़ांत त्यांना दुसऱयांदा कोरोना झाला आहे. आपल्या आजारपणात त्यांनी मोठा निर्णय घेत मुलाला उत्तराधिकारी बनवले आहे. आता मी सर्व काही मुलाच्या हाती देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ललित मोदी यांना तीन दिवसांपूर्वी मेक्सिको सिटीतून विमानाने लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधूनच त्यांनी फॅमिली ट्रस्टचा राजीनामा दिला आणि कुटुंबाची कमान मुलगा रुचिरकडे सोपवण्याची घोषणा केली.
ललित मोदी यांनी केके मोदी फॅमिली ट्रस्टची ललित कुमार मोदी (एलकेएम) शाखा मुलगा रुचिरला सुपूर्द केली. आता ललित मोदी यापुढे ट्रस्टचे लाभार्थी असणार नाहीत. त्यांनी राजीनामाही जाहीर केला. या ट्रस्टबाबत ललित मोदांची आई बिना आणि बहीण यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यांची आई बिना मोदी यांनी या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.