नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राफेल फायटर विमानांची दुसरी तुकडी पुढच्या काही आठवडय़ात अंबाला एअर बेसवर दाखल होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱयांनी गुरुवारी दिली. ‘राफेल’ फायटर विमान प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी टू स्टार अधिकाऱयांच्या नेतृत्वाखालील भारतीय वायुदलाचे एक पथक सध्या फ्रान्समध्ये आहे. या पथकाकडून राफेल विमानांची पाहणी आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली जात आहे. पुढच्या काही आठवडय़ात आणखी तीन ते चार राफेल विमाने भारतात दाखल होतील. चीन-पाकिस्तान सीमेवर तणाव असताना, 4.5 जनरेशनच्या या फायटर विमानांमुळे भारताची हवाई शक्ती कैकपटीने वाढणार आहे. भारताने फ्रान्सला 36 राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील पाच विमाने 29 जुलै रोजी भारताच्या स्वाधीन करण्यात आली होती. दर दोन महिन्यांच्या अंतराने तीन ते चार राफेल विमाने भारताकडे सोपवली जातील अशी अपेक्षा आहे.