ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने 12 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. अहमदाबादस्थित झायड्स कॅडिलाच्या ‘ZyCoV-D’ या तीन डोसच्या लसीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. तसेच या महिन्यात राष्ट्रीय कोरोना अँटी-व्हायरस लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश करण्यात येणार आहे. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
केंद्राने यापूर्वीच झायड्स कॅडिलाच्या ‘ZyCoV-D’ लसीच्या 1 कोटी डोस खरेदीचा आदेश दिला आहे. ज्याची किंमत कर वगळून प्रति डोस जवळपास 358 रुपये आहे. 28 दिवसांच्या अंतराने या लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. डीएनए-आधारित आणि सुईमुक्त अशी देशात विकसित करण्यात आलेली जगातील ही पहिली लस आहे. 20 ऑगस्ट रोजी औषध नियामकाने ‘ZyCoV-D’ ला तातडीच्या वापरासाठी मान्यता दिली होती.