वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाला लवकरच हिंसक वळण मिळण्याची भीती आहे. रशिया लवकरच युक्रेनवर हल्ला करू शकतो, रशियाने याकरता मोठय़ा स्तरावर तयारी केली असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात म्हटले गेले आहे. या अहवालानुसार रशियाचे सैन्य विविध ठिकाणांवरून युक्रेनच्या विरोधात सैन्य कारवाई करू शकते.
अमेरिकेच्या इंटेलिजेन्स इनपुटविषयी ब्लूमबर्गने एक वृत्तअहवाल प्रकाशित केला आहे. यानुसार अमेरिकेने स्वतःच्या नाटो सहकाऱयांना गुप्तचर माहितीसह काही नकाशेही उपलब्ध केले आहेत. या माहितीच्या आधारावर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे युक्रेनवर हल्ला करू पाहत असल्याचे मानले जातेय. पुतीन पुढील वर्षी सैन्य कारवाईचे आदेश देऊ शकतात.
विविध ठिकाणांवरून आक्रमण
युक्रेनवर विविध ठिकाणांवरून हल्ला करण्याची पुतीन यांची योजना असून याकरता सुमारे 100 सैन्य तुकडय़ांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. या बटालियन्स क्रीमिया, रशिया आणि बेलारुसमार्गे हल्ला करू शकतात असे मानण्यात येत आहे. याकरता सुमारे 1 लाख सैनिकांना सज्ज राहण्यास सांगितले गेले आहे. युक्रेनच्या बर्फाळ स्थितीचा सामना करण्यासाठी तयार रहा अशी सूचना तुकडय़ांना करण्यात आली आहे.
पुतीन यांनी फेटाळला दावा
रशियाचे सैन्य युक्रेनवर कब्जा करण्यासाठी युद्ध पुकारणार असल्याचा दावा पुतीन यांनी मागील आठवडय़ात फेटाळला होता. रशियाला कठोर पावले उचलण्यास भाग पाडू नका असा इशाराही त्यांनी दिला होता.